
कोल्हापूर : पंचगंगेसाठी लोकजागर.
कोल्हापूर: पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आता कोल्हापूरकरांचा लोकजागर सुरू झाला आहे. गुरुवारी (ता. २१) महावीर महाविद्यालयाचे विद्यार्थी भव्य जनजागृती फेरी काढणार असून, विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून विविध कलाविष्कारांतूनही प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावरूनही डीपी, स्टेटस अशा माध्यमातून ‘चला, आपली जीवनदायिनी वाचवूया’, अशा आशयाचे संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ शेअर होऊ लागले आहेत. दरम्यान, महावीर कॉलेजपासून सिद्धार्थनगर, जुना बुधवार, पंचगंगा घाट, गंगावेश अशा प्रमुख मार्गांवरून जनजागृती फेरी निघणार आहे.
प्रदूषणामुळे पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीने कोल्हापूरकर वज्रनिर्धार करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रबोधनाच्या अस्सल कोल्हापुरी संकल्पनाही पुढे येऊ लागल्या आहेत. ‘चल, भावा पंचगंगा घाटावर’, ‘यायला लागतंय’ अशा आशयाचे संदेश सर्वत्र शेअर होत असून ‘जलधारा जीवन आहे. जलामुळे जग पावन आहे’, अशा आशयाची गाणीही वाजू लागली आहेत. त्याचवेळी ‘पंचगंगा पंचगंगा, होतोय आम्हा पश्चाताप, आम्हीच केली गटारगंगा, पदरात घे आमचे पाप..’ अशा कविताही प्रबोधन करू लागल्या आहेत.
पिरळ (ता. राधानगरी) येथून येणाऱ्या जलदिंडीचे शुक्रवारी (ता. २२) सकाळी साडेसात वाजता पंचगंगा घाटावर स्वागत होणार आहे. यानिमित्ताने पंचगंगा घाटाची स्वच्छता आणि जलसंवर्धन प्रतिज्ञा, असा कार्यक्रम होणार असून यावेळीही शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी पोवाड्यातून प्रदूषणमुक्तीचा संदेश देतील.
पोलिस बॅंड जल संवर्धनावर आधारित गीतांच्या धून यावेळी सादर करणार असून कॉलेजियन्स मंडळी पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर करणार आहेत.तुम्हालाही मोहिमेत सहभागी व्हायचंय ? चला, तर मग शुक्रवारी (ता. २२) सकाळी सात वाजता पंचगंगा घाटावर जमूया. स्वच्छतेचा संदेश देत पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा संकल्प करूया...!
पाणी व्यवस्थापन, पाणी संवर्धन, पाणी पुनर्वापर, पाणी पुनर्भरण या चार कृतींनी सर्वांनी मिळून पाण्याची योग्य काळजी घेऊन थोडी गरज भागवू शकतो. एनएसएस, भारतीय जल संस्कृती मंडळ, निसर्ग मित्र, वासुंधरा, क्लीन कोल्हापूर यासारख्या वेगवेगळ्या संस्थांमधून काम करत असताना पाण्याचे शिक्षण हे ही बाल वयापासून अविरत चालू ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रामुख्याने गोड पाणी हे शेतीसाठी वापरत असताना त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन करणे आणि मग उपयोगात आणणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.
- डॉ. स्मिता गिरी,
‘एनएसएस’ कार्यक्रम अधिकारी, गोखले महाविद्यालय
नद्यांची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रम प्रदूषण कमी करणारे उपाय हाती घेऊन नद्यांतील पाण्याचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट राखतो. १६ राज्यांतील ३४ नद्यांवर हा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्रातील पंचगंगा, कृष्णा, गोदावरी, तापी, आणि मुळा-मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी एकूण १ हजार १८२ कोटी ८६ लाख खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून २०८ कोटी ९५ लाखांचा निधी वितरित केला आहे.
- मनीष देसाई, महासंचालक (पश्चिम विभाग), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, मुंबई
Web Title: Kolhapur Lokjagar Panchganga Pollution
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..