
कोल्हापूर : जेवणावळ्या जोरात, पाकिटे पोच घरात
कोल्हापूर: मतदानाची तारीख जवळ येईल तसा पोटनिवडणुकीचा जोर वाढत आहे. जेवणावळी दिसू नयेत, कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून पारंपरिकऐवजी हायटेक प्रकारांचा अवलंब केला जात आहे. विविध प्रकारचे पास देण्याऐवजी नावे आता थेट मोबाईलवरून पाठवली जात आहेत. भागातील हॉटेलमधील ताटांची संख्या वाढत असल्याने ती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक हॉटेलवर आचाऱ्यांची संख्या वाढवण्याची वेळ आली आहे; तर केवळ परिसरातीलच नव्हे तर शहराच्या हद्दीवरील हॉटेलापर्यंत माणसे पाठवली जात आहेत.
आचारसंहितेमुळे जाहीर जेवणावळींवर बंधने आली आहेत. मात्र, त्यातून पळवाटा काढून हॉटेलात जेवण दिले जात आहे. त्यावरही ‘वॉच’ ठेवला जात असल्याने तसेच कायदेशीर कचाट्यात सापडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी व हॉटेल चालकांनी नवीन मार्ग शोधला आहे. कागदी कूपन देण्याऐवजी ज्याच्या माध्यमातून जी माणसे हॉटेलात जाणार असतात, त्यांच्या नावांचा मोबाईलवर ग्रुप तयार करून ती नावे हॉटेलचालकापर्यंत पोहोचवली जात आहेत. या प्रकारामुळे हॉटेलात जाणाऱ्यांची संख्या तीन ते चार दिवसांपासून वाढत असल्याचे दिसते.
अनेक जण खात्रीसाठी भागातील हॉटेल निवडतात. मात्र, संख्याच जास्त होत असेल तर त्याच ठिकाणी जेवण उपलब्ध होत नाही. परिणामी, वेगवेगळ्या ठिकाणची हॉटेल निवडली जात आहेत. यामुळे जिथे वीस-पंचवीस ताटे म्हणजे डोक्यावरून पाणी असायचे तिथे २००-२०० ताटांच्या ऑर्डर येऊन पडत आहेत. ही व्यवसायाच्या दृष्टीने संधी असली तरी ते बनवण्यासाठीची यंत्रणा अनेकांकडे नव्हती. अनेकांना तर ‘काय पण करा, इतक्यांना जेवण देण्याची व्यवस्था करा’ असे वेगवेगळ्या ठिकाणांहून निरोप दिले जात आहेत. दोन दिवस नियमित ताटे देण्याचे निरोप देणाऱ्यांकडून कबूल करूनच ही पुढील तयारी चालकांनी केली आहे.
किराणा बाजाराची कूपन्स
सारेजण जेवणासाठी आतूर असतात, असे नाही. जे जाऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी ‘वेगळा’ मार्ग अवलंबला जात आहे. काही ठिकाणी किराणा बाजार खरेदीसाठीची एक हजाराची कूपन्स शहराच्या मोठ्या भागात पोच केल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी तर मतासाठी नव्हे, साहेबांकडून ‘ही’ भेट म्हणून समजा, असेही सांगितले जात असल्याचे समजते.
Web Title: Kolhapur Lunch House Packets House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..