Kolhapur News : कोल्हापुरात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतर्फे निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Kolhapur News

Kolhapur News: कोल्हापुरात राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतर्फे निषेध

कोल्हापूर : ‘भाजप सरकार डरती है, ईडी को आगे करती है’, किरीट सोमय्या यांचा धिक्कार असो, यासारख्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थान व साखर कारखान्यावर ईडीने टाकलेल्या धाडीचा निषेध नोंदवला.

गडहिंग्लज शहरात बंद पाळून, तर उत्तूरला निषेध फेरीतून कारवाईचा निषेध नोंदवला. कोल्हापूर शहरात शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत राज्य सरकारसह भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध केला.

दरम्यान, ही कारवाई नियोजित असून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे, त्वरित कारवाई बंद करा, अन्यथा कोल्हापुरात उद्रेक होईल, असा इशारा शहरातील आंदोलनकर्त्यांनी दिला. असले राजकारण लोकशाहीला घातक असल्याचा आरोपही केला.

आंदोलनात शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, अनिल कदम यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गडहिंग्लज अचानक बंद

मुश्रीफ यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडहिंग्लजमध्ये कार्यकर्त्यांनी अचानक बंद पुकारला. कार्यकर्त्यांनी शहरभर फेरी मारून बंदचे आवाहन केले.

बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख बाजारपेठेत फिरून कार्यकर्ते व्यापाऱ्यांना अचानक बंदची हाक देत होते. फेरी येईल तशी दुकाने बंद होत होती.

फेरी पुढे गेल्यानंतर काही वेळाने बहुतांश व्यापारी पूर्ववत दुकाने सुरू करीत होते. प्रांत कार्यालयासमोर शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, किरण कदम, युवक शहराध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांनी भाषणात राज्य सरकारचा निषेध केला.

उत्तूरला निषेध फेरी

उत्तूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध फेरी काढली. भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

उत्तूर विभागप्रमुख वसंतराव धुरे, सरपंच किरण आमणगी, काशिनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, महादेवराव पाटील, शिरीष देसाई, दीपक देसाई, गंगाधर हराळे, संभाजी तांबेकर आदी सहभागी झाले होते.

बिद्रीत महामार्ग रोखला

बिद्री (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्ग रोखून धरत रस्त्यावरच ठिय्या मारला, तर टायर पेटवून देत भाजप-शिंदे सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुश्रीफ यांच्यावर धाड टाकल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी केला.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती जयदीप पोवार, डी. एम. चौगले, सरपंच पांडुरंग चौगले, पांडुरंग हरी पाटील, अण्णासो पोवार, के. के. फराकटे, राजेंद्र चौगले, विनोद वारके, दत्तात्रय पाटील, विशाल चौगले आदी उपस्थित होते.