
कोल्हापूर: नवजात बालकांसाठी मिल्क बॅंक
कोल्हापूर : नियतीच्या विचित्र फेऱ्यात एखादे बालक जन्माला येते. आई त्या बाळाला दूध देऊ शकत नाही तर कधी त्या बाळाच्या आईचे छत्र हरपते. अशा बाळांना मातेच्या दुधासाठी टाहो फोडण्याची वेळ येते, अशा घटना अनेकदा अनुभवण्यास मिळतात. कोणतीही नवोदित स्तनदा माता पुढे येऊन त्या तान्हुल्याला दूध देऊ शकते. या पार्श्वभूमीवर ‘सीपीआर’मध्ये नवजात बालकांसाठी मिल्क बॅंक साकारली आहे. येथे स्तनदा मातांना अतिरिक्त दूध दान करता येणार आहे.
दरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आठवड्याला एक ते पाच नवजात तर महिन्याभरात चार ते वीस बालकांवर जन्मदात्या मातेच्या दुधापासून वंचित रहावे लागते. अशा बाळांना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, अपरात्री केव्हाही भूक लागताच ती रडू लागतात. अशावेळी त्या बालकाला दूध द्यावे कोठून? असा प्रश्न उपस्थित होतो. बालकांचे पालक अथवा अन्य महिला या समस्येने हवालदिल होतात. स्तनदा मातेचे दूध तत्काळ उपलब्ध करू शकत नाहीत.
शास्त्रीय दृष्टिकोनातून स्तनपान हे नवजात बालकाच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्वाधिक हिताचे मानले जाते. मात्र, नवजात बालकांची माता गंभीर आजारी असेल,
ती उपचार घेत असेल किंवा दुर्दैवी घटनेत मातेचा मृत्यू झाला असेल तर तिच्या बाळाला दूध देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवतो. राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. काही मोजक्या जिल्ह्यात स्तनदा माताकडून अतिरिक्त दूध संकलन करून ते शीतकरण यंत्रणेत साठवून ठेवले जाते आणि ते अशा बालकांना दिले जाते. त्यासाठी अमृतधारा दुग्ध पेढी मिल्क (मदर्स मिल्क बॅंक) ही संकल्पना राबवली जात आहे.
जिल्ह्यात प्रथमच ‘सीपीआर’मध्येही दुग्ध पेढी होत आहे. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीतून मिल्क बॅंक साकारली आहे. येथे ज्या स्तनदा माता आहेत, त्यांना अतिरिक्त दूध मातेपासून विलग असलेल्या बालकांसाठी देता येणार आहे. निरोगी व सदृढ आरोग्य असलेली स्तनदा माता त्यासाठी पुढाकार घेऊन स्वतःचे अतिरिक्त दूध अन्य बाळासाठी देऊ शकणार आहे.
आज उद्घाटन
‘सीपीआर’मध्ये साकारलेल्या अमृतधारा दुग्धपेढीचे उद्घाटन रविवार (ता. ८) ला दुपारी एक वाजता होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह अन्य मंत्र्याची प्रमुख उपस्थिती असेल.