
कोल्हापूर :महापालिका निवडणूक बिगुल लवकरच वाजणार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली अंतिम प्रभाग रचना मंगळवारी (ता. १७) जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित निवडणूक कार्यक्रमाला गती मिळाली आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पुढील महिन्याभरात आरक्षण सोडत होऊन आरक्षण निश्चिती केली जाईल.
कोल्हापूर महापालिकेचे सभागृह १५ नोव्हेंबर २०२० रोजी बरखास्त झाले. त्यानंतर २०२१ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची तयारी सुरू झाली; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे निवडणुकीची प्रक्रिया थांबली आणि महापालिकेवर प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षे कोरोना आणि महापूर यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचे निश्चित झाले. प्रशासनानेही त्रिसदस्य असणारे ९१ प्रभाग जाहीर केले व त्यावर नागरिकांच्या हरकती मागवल्या. हरकतींवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवला; मात्र त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकासाठी असणारे ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे प्रभाग रचना निश्चित करण्याची प्रक्रिया थाबंली.
राज्य सरकारने प्रभागरचना आणि तारीख निश्चितीचे अधिकार कायदा करून आपल्याकडे घेतले. त्यामुळे पुन्हा निवडणुकीसमोर अनिश्चिततेचे सावट होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत रखडलेली निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभाग रचना जाहीर केली आहे; त्यांनी ती १७ मे पर्यंत अंतिम करून जाहीर करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होईल. त्यानंतर पुढे आरक्षण सोडत होऊन आरक्षित प्रभाग जाहीर केले जातील. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकामुळे लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.या महापालिकांचीही प्रभाग रचना होणार जाहीर
नवी मुंबई, वसई - विरार, उल्हासनगर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी - चिंचवड, कल्याण - डोंबिवली, मुंबई, ठाणे.
Web Title: Kolhapur Municipal Election Trumpet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..