
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. मोक्याच्या सहकारी संस्थांवर नेत्यांनी आपल्या वारसदारांचीच वर्णी लावली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची दुसरी फळीच उद्ध्वस्त झाल्यासारखी स्थिती आहे. नेते सत्तेच्या वळचणीला, पण वर्षानुवर्षे स्वतःच्या नेत्याचा गट सांभाळणारे कार्यकर्ते वाऱ्यावरच असे चित्र प्रत्येक निवडणुकीत दिसते. यावेळची विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद राहिली नाही.