esakal | Kolhapur : शड्डू घुमण्याआधीच मल्ल आखाड्याबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : शड्डू घुमण्याआधीच मल्ल आखाड्याबाहेर

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : ‘एक वॉर्ड-एक सदस्य’ प्रभागामुळे नगरसेवक होण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या अनेक इच्छुकांची ‘शड्डू घुमण्यापूर्वीच मल्ल आखाड्याबाहेर’ अशी अवस्था झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार असून, बंडखोरीला लगाम बसणार आहे. यामुळे इच्छुकांची संख्या गळण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाच्या तगड्या उमेदवारांसमोर आपला टिकाव लागणार नाही, अशी भावना इच्छुकांत दिसत आहे.

‘एक वॉर्ड एक नगरसेवक’ धोरणामुळे प्रभागांची भौगोलिक व्याप्ती मर्यादित होते. यामुळे प्रत्येक इच्छुक ‘मी निवडून येतोच...’ असा ग्रह करून निवडणुकीच्या तयारीला लागला होता. संपर्क मोहिमाही वाढविल्या होत्या. गडहिंग्लजचेच उदाहरण घ्यायचे झाले तर एकेका प्रभागात पक्षाचे इच्छुक वगळता आणखी चार-पाच जणांची तयारी सुरू झाली होती. यामुळे पक्षांचे महत्त्व कमी होऊन बंडखोरी आवरण्यातच नेत्यांना नाकीनऊ येणार होते. वाढणारे इच्छुक कोणाच्या तरी पराभवास कारणीभूत ठरतात. यातून पक्षाच्या उमेदवारालाच अधिक धोका गृहीत धरला जातो.

या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी, मुख्यत: राष्ट्रवादीने एक सदस्यीय धोरणाला विरोध करत बहुसदस्यीय प्रभाग रचना आणण्याचा आग्रह धरला. यामुळे मंत्रिमंडळाने द्विसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आणली. यातून आता एक सदस्यीय पद्धतीत ज्यांचा संपर्कातून विजयाचा अधिक विश्‍वास होता, ते इच्छुक द्विसदस्यीय धोरणात बाजूला जाण्याची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा: आडाळी एमआयडीसीची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी

यामुळे अप्रत्यक्षरीत्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अधिक महत्त्व येणार आहे. बंडखोरीला लगाम घालण्यासाठी नेत्यांनाही सोयीचे होणार आहे. एक वॉर्डमुळे विजयाच्या आशेने आखाड्याची तयारी सुरू केलेल्या इच्छुक मल्लांचा शड्डूच आता घुमणार नाही. त्यापूर्वीच या मल्लांना आखाड्याबाहेर जावे लागणार आहे. द्विसदस्यीय पद्धतीत काही अपक्षांची भीती असली तरी त्याचे फारसे गांभीर्य नेत्यांना वाटणार नाही. दरम्यान, सन २०११ व २०१६ च्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनुक्रमे चार व दोन सदस्यीय प्रभाग रचना होती.

पैऱ्यातून विजयाची खात्री

द्विसदस्यीय प्रभाग रचनेत राजकीय पक्षांना विजयाची खात्री आहे. दोनपैकी एक उमेदवार तगडा असला तरीही दुसरा कमी ताकदीचा उमेदवारही विजयापर्यंत जातो. या पैरा पद्धतीचा लाभ गतवेळच्या निवडणुकीत गडहिंग्लजमध्ये जनता दलाला झाल्याचे चित्र होते. आगामी निवडणुकीत मात्र पैऱ्याचा लाभ कोणाला होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

loading image
go to top