Rahibai Popere: पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahibai Popere News

Rahibai Popere: पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा भद्रकाली ताराराणी पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना देण्यात येणार आहे. ५१ हजार रूपये, शाल - श्रीफळ, गौरवपत्र, भद्रकाली ताराराणीचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मंगळवारी (ता. १७) डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवनात सकाळी अकरा वाजता पुरस्कार वितरण होईल. तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पाटील म्हणाले,‘‘डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या ९० व्या वाढदिवशी शिक्षक व सेवकांतर्फे कृतज्ञतापूर्वक दिलेल्या गौरव निधीतून हा पुरस्कार दिला जातो.

यंदाचा पुरस्कार अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील बीजमाता पोपेरे यांना देण्यात येणार आहे. पद्मश्री पोपेरे या गेली ३० वर्षे पारंपरिक बियांणांच्या वाणांचे संरक्षण व संवर्धन करत आहेत.

त्यांनी आपल्या परसबागेत देशी वाणांच्या फळभाज्या, कडधान्ये, तृणधान्ये यांची लागवड केली. याद्वारे ५२ पिकांचे १५४ वाण त्यांनी तयार केले आहे.

त्यांच्या या कार्याचा गौरव यानिमित्ताने होणार आहे. ’’ विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एस. एम. पवार, प्राचार्य सी. आर. गोडसे, प्रा. ए. एम. साळोखे, प्रा. सुजय पाटील, प्रा. अनिल घस्ते उपस्थित होते.