esakal | अर्थसंकल्पात घोषणा; कोल्हापूर "पॅटर्न' आता राज्यभर 
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur pattern of interest waiver Statewide kolhapur marathi news

पूर्वी एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जात होते. त्यापुढील दोन लाखापर्यंतच्या कर्जावर दोन टक्के तर तीन लाखाच्या पुढे जादा व्याज दर आकारण्यात येत होता.

अर्थसंकल्पात घोषणा; कोल्हापूर "पॅटर्न' आता राज्यभर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा जिल्हा बॅंकेचा निर्णय राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या निर्णयाची घोषणा केली. जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 91 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 


जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला व्याज माफ करण्याची घोषणा अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. यासाठी बॅंकेचे संचालक व आमदार पी. एन. पाटील यांनीच तशी मागणी लावून धरली होती.  पाटील यांच्या शेतकरी वर्गातून आलेल्या मागणीचा विचार करून  मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर केला. आज उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातही जिल्हा बॅंकेचा हा निर्णय राज्यभर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचे स्वागत होत असून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

तीन लाखांपर्यंच्या कर्जावर व्याज माफ 
पूर्वी एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जात होते. त्यापुढील दोन लाखापर्यंतच्या कर्जावर दोन टक्के तर तीन लाखाच्या पुढे जादा व्याज दर आकारण्यात येत होता. जिल्ह्यातील एकूण कृषी कर्जापैकी सुमारे 92 टक्के कर्ज हे जिल्हा बॅंकेकडून दिले जाते. तोटा सहन करून बॅंक दरवर्षी सुमारे 1500 ते 1600 कोटी रूपयांची तरतूद करते. जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 92 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. कर्ज परतफेडीची चांगले प्रमाण व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांकडून होणारी वसुली यामुळे बॅंकेने तीन लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी आता राज्यभर होणार आहे. 

आता 5 लाखांचा निर्णय 
जिल्हा बॅंकेची व्याज सवलत योजना राज्यभर राबवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भविष्यात जिल्हा बॅंकेकडून पाच लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने देण्याचा विचार आहे. लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव बॅंकेच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

संपादन-अर्चना बनगे