
कोल्हापूर : खासदार मुश्रीफांकडे; मुलगा राजेंकडे
कोल्हापूर: कागल तालुक्यातील जातीयवाद वाढू नये म्हणून मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व मी एकत्रित काम करू असे सांगणाऱ्या खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी ‘शाहू-कागल’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कागलच्या राजकारणातील नव्या ‘ट्विस्ट’मुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान, समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत एकोंडी (ता. कागल) येथे झालेल्या कार्यक्रमात वीरेंद्र यांनी ‘गोकुळ’मध्ये विश्वासघाताने झालेला माझा पराभव ही आमच्या गटाची भळभळती जखम असल्याचे सांगून मुश्रीफ यांनाच एकप्रकारे इशारा दिला. कालच (ता. १८) तालुक्यातील कौलगे येथे झालेल्या कार्यक्रमाला खासदार प्रा. मंडलिक यांच्यासह मुश्रीफ व संजय घाटगे एकाच व्यासपीठावर होते. याच दिवशी एकोंडी येथे झालेल्या कार्यक्रमात वीरेंद्र व समरजितसिंह एका व्यासपीठावर दिसल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गेल्यावर्षी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत वीरेंद्र यांच्यासह त्यांच्या आत्या व आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुस्मिता यांचा पराभव झाला. श्री. मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आदींच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमध्ये दोन्हीही उमेदवार होते. ‘गोकुळ’मधील आपला पराभव ठरवून केल्याचा आरोप वीरेंद्र यांनी सोशल मीडियावर केला होता. त्यांचा रोख मुश्रीफ यांच्यावर होता. पराभवापासून वीरेंद्र यांनी श्री. मुश्रीफ यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. त्याचवेळी त्यांचे समरजितसिंह यांच्याशी संबंध वाढले आहेत.
वीरेंद्र-समरजितसिंह यांच्यातील वाढलेल्या संबंधाची झलक यापूर्वी शाहू कारखान्याच्या निवडणुकीतही दिसली होती. श्री. मुश्रीफ गटाच्यावतीने संजय घाटगे यांच्या काही समर्थकांचे अर्ज ‘शाहू’च्या निवडणुकीत दाखल केले होते. शाहू कारखाना मल्टिस्टेट असल्याने या कारखान्याच्या सभासदांना अन्य कारखान्यांना ऊस घालता येत नाही. संजयबाबा यांच्या ज्या समर्थकांनी शाहूसाठी अर्ज दाखल केले होते, त्यांचा ऊस ‘हमीदवाडा’ कारखान्याला आला नसताना या सभासदांचा ऊस आल्याचे पत्र ‘हमीदवाडा’कडून दिले होते.
या मुद्यावर ‘शाहू’च्या निवडणुकीत संजय समर्थकांचे अर्ज छाननीत बाद ठरले आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. ही पत्रे देण्यातही वीरेंद्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता खासदार एकीकडे आणि त्यांच्या मुलाच्या वेगळ्या भूमिकेची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
समरजितसिंह ‘फास्ट’
कागलच्या राजकारणात समरजितसिंह घाटगे यांनी आक्रमकपणे सुरुवात केली आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही त्यांनी ‘गोकुळ’मध्ये वीरेंद्र यांचा पराभव कसा झाला, असा प्रश्न करत मुश्रीफ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. आता वीरेंद्र यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन आपल्या हातात काही तरी लागल्याचा संदेश समरजितसिंह यांनी दिल्याचे बोलले जाते.
Web Title: Kolhapur Politica News Mp Mushrif
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..