कोल्हापूर : अमाप उत्साहात प्रतिपंढरपूरवारी

रिंगण सोहळ्यात चैतन्य ऊर्जा; विठ्ठल नामजपात दुमदुमला आसमंत
 wari
wari sakal
Updated on

कोल्हापूर : जयहरी विठ्ठलचा अखंड नामजप करीत, अमाप उत्साहात नंदवाळ (ता. करवीर)च्या आषाढी यात्रेला निघालेल्या वारकरी दिंड्या पुईखडीच्या माळावर पोहचल्या... आणि अवघा भक्ती रंग एक होत झालेल्या रिंगण सोहळ्याने हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भगवा ध्वज घेऊन धावलेल्या दोन मानाच्या अश्वांच्या भेदक तितक्याच चित्तथरारक दौडीने भाविकही थक्क झाले. याच वेळी पावसाने जलपुष्‍पाच्या सरींचा वर्षाव करीत भाविकांना भक्तिभावात चिंब केले. रिंगण सोहळ्याने दिलेली ही चैतन्याची ऊर्जा घेऊन तमाम भाविकांच्या भक्तीचा प्रवाह नंदवाळच्या दिशेने मार्गस्त झाला तसा जय हरी विठ्ठलच्या अखंड गजरात आसमंतही दुमदुमून निघाला.

विठ्ठल भक्तीची पूर्वापार परंपरा जपत गावोगावचे भक्तगण विठ्ठल दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रेला जातात. मात्र अनेकांना नित्य जगण्यातील अडचणी व अथवा वयपरत्वे पंढरपूरला जाणे अशक्य होते अशा भाविकांना त्यांच्या मनातील माऊलीची ओढ मात्र स्वस्थ बसून देत नाही.

‘माऊलीची भेट असो दूर अंतरी, माऊलीचा नामजप माझीया मुखी...’ असाच काहीसा भाव मनी घेऊन गावोगावीचे वारकरी प्रती पंढरपूर असलेल्या नंदवाळाच्या माऊलीची पालखी घेऊन पायीदिंडीने निघाल्या. काल शनिवारी झालेल्या नगरप्रदक्षणेनंतर सासने हॉलमध्ये विसावलेला पालखी सोहळा आषाढीच्या निमित्ताने आज सकाळी नंदवाळच्या दिशेने मार्गस्थ झाला. दिंडी प्रमुख आनंदाराव लाड व चोपदार भगवान तिवले यांच्या आदेशाने पालखीसह दिंडी शिवाजी पेठ मार्गे पुढे सरकती झाली. पांढरी वेशभूषा केलेले वारकरी, टाळ मृदंगाच्या ताल सुरात जय हरी विठ्ठलचा गजर करीत दिंडी पुढे निघाली. ढोल-ताशांच्या गजर, झांज पथक, मानाचे घोडे, पारंपरिक वेशभूषेत महिलांची भजनी मंडळ, तुलसी वृंदावन डोईवर घेतलेल्या महिला भगिणी जय हरी विठ्ठलच्या गजरात नंदवाळची वाट चालू लागल्या.

शिवाजी पेठ, साने गुरुजी वसाहत मार्गे पालखी दिंडीकरी वारकरी मेळा पावणा एक वाजता पुईखडी येथे आला. आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थित पालखी पूजन झाले. याच वेळी पारंपरिक वेशभूषातील अश्वारोहकाने दोन अश्वांच रिंगण सोहळ्यातील पहिली सलामीची फेरी केली तसा जय हरी विठ्ठलचा जप दुमदुमू लागला. अनेकांनी अश्वाच्या पाऊल खुणांची धूळ कपाळी लावत श्रद्धा जपली. या वेळी वारकऱ्यांकडून हरी विठ्ठलचा गजर टिपेला पोहचला, टाळ मृदंगाच्या तालावर मानाचे अश्व धावू लागले तसा एकच थरार उडाला, अश्वारोहकाच्या हातातील फडफडता भगव्या ध्वजाने वारकरी सांप्रदायाची जणू ओळखच द्विगुणित केली. पहिली, दुसरी, तिसरी, रिंगण फेरीत होत असताना पावसानेही जलपुष्पांचा जणू रिंगण सोहळ्यावर वर्षावच केला. तसे या रिंगण सोहळ्याने चैतन्य बहरले. या चैतन्याची ऊर्जा घेऊन पालखी सोहळा पुन्हा नंदवाळच्या वाटेने मार्गस्त झाला.

वारी मार्गावर प्रसाद वाटप

पालखी सोहळा ज्या मार्गाने येणार, त्या मार्गावर विविध स्वयसेवी संस्था, तरुण मंडळ, राजकीय पक्ष, घरगुती व्यक्तीनी प्रसाद वाटप मोठ्या उत्साहत केले. पारंपरिक वेशभूषा, केलेले कार्यकर्ते येणाऱ्या खिचडी, चहा, सरबत, राजगीरा लाडू असा प्रसाद देत होते. तो घेण्यासाठी भाविकांची ठिकठिकाणी झुंबड उडाली. तसा कोल्हापुरांतील भक्ती भावातून एकमेकांप्रती जपलेली आपुलकी दिसली.

फुगडीचा फेर

वारीतील जय हरी नामजपात अंगाच्या ताल सुरात महिला भगीनी तसेच स्वयसेवकांनी ही फुगडीची फेर धरला. चिखल, पाऊस, निसरडी वाट असा सर्व समस्यांच्या झुगारून देत अबाल वृद्धांनी फुगडीचा फेर धरला. मनोमनीचा आनंदी भाव व्यक्ती करीत जणू वारीला चैतन्य व प्रसन्नतेची ऊर्जा दिली.

कलाकारांचा विठूरायाचा गजर

वारीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशनतर्फे "कलेचिया वारी"हा उपक्रम राबविला. मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरपासून उपक्रम सुरू झाला. शहर परिसरातील नृत्य, नाट्य, संगीत, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी या विठूरायाचा गजर केला पारंपारिक वेशभूषेतील सहभागी झालेल्या कलावंतांनी महाराष्‍ट्राची भक्ती परंपरेला जणू उजाळा दिला. यावेळी तुळस वाटपही केले. अशी माहिती फाउंडेशनचे संग्राम भालकर यांनी दिली.

शिवरूपात विठ्ठलाची महापूजा

मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे विविध धार्मिक विधी झाले. शिवरूपातील विठ्ठलाची महापूजा बांधली गेली. मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव, आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्ष सत्यजित जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. त्याशिवाय दोन वर्षानंतर विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दिवसभर विविध कार्यक्रम आणि प्रसाद वाटप झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com