
कोल्हापूर : राधानगरीचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले
राधानगरी : पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरण आज पहाटे पूर्ण भरले. पहाटे साडेपाच ते दुपारी सव्वातीनच्या दरम्यान धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून पाच हजार ७१२ आणि वीजनिर्मितीसाठी सोडलेले एक हजार ६०० असा सात हजार ३१२ क्युसेस विसर्ग भोगावती नदीत सुरू होता. दरम्यान, रात्री नऊला चारपैकी तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला.यामुळे भोगावती नदीतील विसर्ग कमी होऊन तो पाच हजार ८८४ क्यूसेकवर आला. पावसाचा अधूनमधून जोर आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. दूधगंगा धरणातूनही विसर्ग वाढला आहे.
काळमवाडी ८४ टक्के भरले
दरम्यान, काळमवाडी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढला. पूर्वीचा व हा मिळून १९६५ शिवाय वीजनिर्मितीसाठी १५०० असा ३४६५ क्युसेक विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असून, गेल्या २४ तासांत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळपासूनच्या दहा तासांतच ८१ मिलिमीटर पाऊस येथे झाला. धरण सध्या २१.४७ टीएमसी म्हणजे ८४.३४ टक्के इतके भरले आहे.
दृष्टिक्षेपात
० पहाटे साडेपाचला जलाशय पातळी ३४७.४० फुटांपर्यंत
० सर्वप्रथम सहा क्रमांकाचा, नंतर टप्प्याटप्प्याने पाच, चार आणि तीन क्रमांकाचा दरवाजा खुला
० रात्री नऊला यातील तीन क्रमांकाचा दरवाजा बंद
० गेल्या वर्षी धरण २५ जुलैला पूर्ण भरले, त्या वेळचा पाऊस दोन हजार ८२० मिलिमीटर
० यंदा धरण भरण्यास १७ दिवस उशीर, आजमितीस दोन हजार ९१० मिलिमीटर पाऊस
० चार दिवसांतील अतिवृष्टीने पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ
० २४ तासांत धरण क्षेत्रात १२२ मिलिमीटर पाऊस
दरवाजे खुले होण्याची घटना पहिल्यांदाच
राधानगरी धरण परिसरात पावसासह वेगवान वारे सुरू असल्याने धरण क्षमतेइतकेच भरले असताना वाऱ्याच्या दाबामुळे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची घटना पहिल्यांदाच या वेळी घडली. पाण्यासह हवेचा दाब दरवाजे पटापट खुले होण्यामागचे कारण असल्याचे दिसून आले, असे धरण व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.