
Kolhapur News : रेल्वेचे पिंक बुक जाहीर; कोकणाला रेल्वे जोडण्यासाठी नगण्य तरतूद
Kolhapur News - रेल्वेचे पिंक बुक नुकतेच जाहीर झाले असून, यात पुणे विभागातील विविध विकासकामे तसेच रेल्वेसेवा विस्तारीकरणासाठी ६०० कोटींची तरतूद केली आहे. यात हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे विस्तारित मार्गासाठी दोन कोटींची तरतूद केली आहे.
असे असले तरी कोल्हापूर रेल्वे वैभववाडीमार्गे कोकणाला जोडण्याच्या प्रकल्पासाठी एक-दोन लाखांची नगण्य तरतूद करून केवळ हा विषय चर्चेत ठेवला आहे. त्यामुळे खासदारांनी जोरदार पाठपुरावा केला तरच कोकण रेल्वेचे काम पुढे सरकण्यास गती मिळेल.
रेल्वेच्या विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद करणारी संभाव्य अर्थिक तरतुदीची पुस्तिका रेल्वेने जाहीर केली आहे. यात पुणे रेल्वे विभागात विविध रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा, उड्डाण पूल, प्लॅटफॉर्म वाढवणे, जंक्शन तयार करणे, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, रेल्वे मार्गावर जॅकेटिंग करणे आदी कामांसाठी प्रत्येक कामासाठी कमीत कमी २ लाख ते १०० कोटीपर्यंतची तरतूद आहे.
मिरज ते कोल्हापूर मार्गावरील ठिकठिकाणी बॅरीकेटींगसाठी अवघी ५० लाखांची तरतूद आहे. तर उड्डाणपुलाला गार्ड लावण्यासाठी ७८ लाखांची तरतूद आहे. त्यामुळे यातून नवीन कामांपेक्षा दुरूस्तीचे काम करणे शक्य होईल, असे दिसते.
पुणे - मिरज - लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. असे झाल्यास कोल्हापूरहून कर्नाटकात तसेच गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची सोय होऊ शकते. त्यासाठी ९०० कोटींची तरतूद आहे. त्यामुळे सध्या मिरजेवरून कर्नाटककडे विशेषतः गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढेल अशी शक्यता आहे.
हातकणंगले रेल्वे स्थानकात इचलकरंजीतील प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी नवीन जोड मार्ग विस्तारीकरण कामासाठी दोन कोटींची तरतूद केली आहे.
या निधीतून येथे नवीन मार्गाचे काम झाल्यास इचलकरंजीतील बहुतांशी कापड उद्योगातील कामगार, नोकरदार, उद्योजक जे परप्रांतात जाणारे - येणारे आहेत, त्यांना याचा लाभ होणार आहे.
हातकणंगले रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगच्या वेळी येणारा ताणही कमी होईल. हातकणंगले इचलकरंजी मार्ग जोडण्यासाठी येथील प्रवासी संघटना तसेच खासदारांनीही पाठपुरावा केला होता.
मागील पानावरून पुढे सुरू
कोल्हापूर रेल्वे कोकणाला जोडावी, ही गेली २५ वर्षांपासूनची मागणी आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले होते. त्यानंतर तीन वेळा सर्व्हे झाला. तीन हजार ७०० कोटींचा प्रकल्प कागदोपत्री तयार झाला.
मात्र, आजवर भक्कम आर्थिक तरतूद झाली नाही. यात पाच खासदारांनी आजवर पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र, त्याचे फलित काही दिसत नाही. हीच स्थिती यंदाच्या पिंक बुकमध्येही आहे.
दरम्यान, चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी अशीच नगण्य तरतूद केल्याने तो मार्गही कोकणाला जोडणे दिवास्वप्नच ठरते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.