Kolhapur Rain Update : कागल, भुदरगडला वळवाने झोडपले; वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळली

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वळीव पावसाने (Kolhapur Rain) वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Update esakal
Summary

कासारवाडी, टोप परिसरात काल वळीव पावसाने अक्षरश: झोडपून काढले. काही घरांचे पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी झाडे पडली.

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या वळीव पावसाने (Kolhapur Rain) वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. कागल शहरासह तालुक्याचा पूर्व भाग, सेनापती कापशी, भुदरगड तालुक्यातील चिकोत्रा खोरा, शिये, टोप, संभापूरसह कोवाड परिसरात वादळासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे कसबा सांगाव, सेनापती कापशी परिसरात झाडे उन्मळून पडली.

तर, टोप-संभापूर रस्त्यावर पेठ वडगावकडे जाणाऱ्या पुलाखाली पावसाचे पाणी आल्याने छोट्या वाहनांची वाहतूक काही काळ थांबवावी लागली. जोरदार वाऱ्यामुळे कोल्हापूर-पुणे महामार्गावर (Kolhapur-Pune Highway) काही काळ धुळीचे लोट पाहायला मिळाले.

Kolhapur Rain Update
Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; भोगावती, पंचगंगा तुडुंब

टोप परिसरात घरांचे पत्रे उडाले

टोप : कासारवाडी, टोप परिसरात काल वळीव पावसाने अक्षरश: झोडपून काढले. काही घरांचे पत्रे उडून गेले, तर काही ठिकाणी झाडे पडली. कासारवाडी येथील जुन्या मराठी शाळेचे पत्रे पुन्हा उडाले. पावसामुळे टोप- पेठवडगाव मार्गावरील भुयारी मार्गात सुमारे गुडघाभर पाण्यातून वाहतूक सुरू होती. आज दुपारी दोनच्या सुमारास टोप, संभापूर, कासारवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास वळवाच्‍या पावसाने चांगलेच झोडपून काढले.

पाऊस, सोसाट्याच्या वारा व गाराही पडल्या. गारांमुळे रस्ते पांढरे झाले होते. यात शेतकऱ्यांनी जनावरांसाठी एकत्रित केलेल्या वैरणीचे भिजून नुकसान झाले. टोप येथील वडगाव फाटा भुयारी मार्गाखालील गटारांची स्वच्छता न केल्याने पाणी तुंबून राहिल्याने बराच वेळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली. पाऊस उघडल्यानंतर काही वेळाने पाण्याचा निचरा झाल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत झाली. जवळच असलेल्या सॅंडच्या कंपनीत पाणी शिरल्याने नुकसान झाले.

Kolhapur Rain Update
Tadoba Forest : चंद्रपुरातील वाघांचे 'सह्याद्री'त होणार स्थलांतर; सात ते आठ वाघांचंच अस्तित्व, सुरक्षित जंगलाची निवड

कागल तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपले

कागल : कागल शहरासह तालुक्याच्या पूर्व भागाला वळीव पावसाने शुक्रवारी अक्षरशः झोडपून काढले. मात्र, वाढत्या उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दिवसभर उष्मा वाढला होता. कागल शहर आणि पूर्व भागातील परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी सव्वादोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर झालेल्या पावसाने कागल शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. सुळकूड, यळगूड, रणदेवीवाडी, पंचतारांकित एमआयडीसी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

Kolhapur Rain Update
कोयना धरण प्रकल्पातून जादा वीजनिर्मिती होणार? वेळेत पाऊस झाला नाही, तर विजेची मागणी वाढण्याची शक्यता

बिद्री परिसरात मेघगर्जनेसह हजेरी

बिद्री : परिसरात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाने गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला

सेनापती कापशी परिसराला वळवाचा तडाखा

सेनापती कापशी : आज दुपारी साडेतीनच्या सुमारास कापशी व परिसराला वादळासह आलेल्या वळीव पावसाने झोडपले. वादळाने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या तर शेतातील काही झाडे उन्मळून पडली. यामुळे दुपारी साडेतीनपासून सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. दुपारपर्यंतच्या उष्म्यानंतर भरून आलेले ढग कोसळले. याचवेळी जोरदार वारा सुटला होता. कापशी ते लिंगनूर मार्गावरील जिजामाता हॉलजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या. यामुळे काही काळ वाहतूक थांबली. पावसाचा जोर कमी झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी या मोडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या आणि वाहतूक सुरळीत केली.

Kolhapur Rain Update
MPSC Exam : कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महिला प्रवर्गातून कागलच्या सायली फासके राज्यात प्रथम

कसबा सांगाव येथे झाडे उन्मळली

कसबा सांगाव : येथे दुपारी दोनच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तुंबलेल्या गटारींमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. दुपारी दोनच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. ग्रामदैवत हजरत लाडले मशायख उरूस सुरू असल्याने अनेक व्यापारी, पाळणा व्यावसायिक, दुकानदार व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असताना जोरदार पावसामुळे त्यांची पंचाईत झाली. वाऱ्यामुळे मगदूम मळा परिसरासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत वाहिन्या तुटल्या. यामुळे गावातील विद्युतपुरवठा बंद झाला. जोरदार पावसामुळे बाजारपेठ चौक, सुळकूड मार्गावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. अण्णाप्पा संतू कांबळे यांच्या घरावर नारळीचे झाड पडून चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदीप कदम आणि अरविंद कदम यांच्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पाल, बारवे, मुरुक्टे परिसरात हजेरी

पिंपळगाव : भुदरगड तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात आज पावसाने हजेरी लावली. सव्वाचार वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. धुळवाफ पेरणीपूर्व मशागत कामासाठी हा पाऊस उपयुक्त आहे. पाल, बारवे, मुरुक्टे, किल्ले भुदरगड येथे पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

कूर, मिणचे परिसरात तासभर पाऊस

कोनवडे : भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे परिसरास वळीवाने झोडपले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सुमारे तासभर हा पाऊस झाला. कोनवडे येथील आनंदा कळमकर यांच्या शेडचे पत्रे वाऱ्याने उडून मोठे नुकसान झाले.

पारगाव, अंबप परिसरात जोरदार

घुणकी : हातकणंगले तालुक्यातील पारगाव, पाडळी, मनपाडळे, अंबप परिसरात वळीव पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. आज दुपारी दोनच्या सुमारास ढगांच्या गडगडासह जुने पारगाव, नवे पारगाव, मनपाडळे, पाडळी, अंबप, तळसंदे, पाडळी, मनपाडळे, वाठार परिसरात पावसाने हजेरी लावली.

कोवाड परिसरात वादळासह झोडपले

कोवाड : येथील परिसराला आज पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट, जोरदार वादळासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील झाडे पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com