कोल्हापूर : शहरात इतरत्रही आता लक्ष द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पार्किंग

कोल्हापूर : शहरात इतरत्रही आता लक्ष द्या

कोल्हापूर: राजारामपुरीतील बंदिस्त पार्किंगवर झालेल्या कारवाईचे स्वागत होत असतानाच आता महापालिका अशीच कारवाई शहराच्या इतर भागांतही सुरू करणार का, हा प्रश्‍न आहे. एखाद्या कारवाईचा गाजावाजा करायचा आणि पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा पायंडा यावेळी तरी निदान पडू नये, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवार (ता. १०) राजारामपुरीतील पार्किंग समस्येबाबत बैठक झाली. त्यात बंदिस्त पार्किंगवर कारवाई करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. काल बैठक, त्यात आदेश आणि आज लगेच महापालिकेने कारवाईचा धडाकाही सुरू केला. आता यात सातत्याची तर गरज आहेच, पण शहराच्या अन्य भागांतील केवळ बंदिस्त पार्किंगवर नव्हे तर रस्त्यावर पार्किंगच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, गुजरी, मंगळवार पेठ, भाऊसिंगजी रोड, मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई रोड अशा सर्वच परिसरात पार्किंगच्या जागेत दुकानगाळे सर्रास दिसत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील पार्किंगची समस्याही अनेक वर्षांपासून आहे.

उपनगरातील फूटपाथ तर लोकांना चालण्यासाठी आहेत का फळ विक्रेत्यांसाठी आहेत, असे वाटावे अशी परिस्थिती आहे; पण त्यावर कधी कारवाई होत नाही. शिवाजी विद्यापीठासमोर सायकल ट्रॅक केला; पण त्यावर चारचाकी वाहनांचे पार्किंग ठरलेले आहे. शहरातील फक्त मोठ्या रुग्णालयांच्या पार्किंगचा शोध घेतला आणि कारवाई झाली तर रुग्णालयाबाहेरील वाहनांची गर्दी कमी होईल. राजारामपुरीत एकाच रस्त्यावर कारवाई न करता तिन्हीही मुख्य रस्त्यावर बंदिस्त पार्किंगच्या ठिकाणी काय आहे, याची पाहणी एकदा महापालिका यंत्रणेने करण्याची गरज आहे. बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्सच्या पार्किंगमध्ये तर खुलेआम व्यवसाय सुरू आहेत. गुजरी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोडवर तर दुचाकी लावायची कुठे, हेच समजत नाही, अशी स्थिती आहे. येथे महापालिका यंत्रणेकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या इमारतीच्या परिसराभोवती जरी प्रशासक किंवा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एखादा फेरफटका मारला तर तिथल्या वाहतूक कोंडीचा अंदाज येऊ शकतो. या परिसरात ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आहे.

Web Title: Kolhapur Rajarampuri Action Elsewhere

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top