
कोल्हापूर : निकालाचा ‘अंदाज पे अंदाज’
कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर निकालाचा ‘अंदाज पे अंदाज’ लावण्याचे काम कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्याला सट्टा बाजार, सोशल मीडियावर फिरणारे एक्झिट पोल, भागनिहाय झालेल्या मतांचा आधार घेत आपलाच उमेदवार कसा निवडून येणार हे सांगितले जात आहे.रिंगणात १५ उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यातच आहे. पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. शनिवारी (ता. १६) यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.
मतदानानंतर प्रत्यक्ष निकालाला चार दिवसांचा अवधी असला तरी विविध माध्यमांतून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून ‘अंदाज पे अंदाज’ वर्तवला जात आहे. या अंदाजाला भागात झालेले मतदान, त्यात मुस्लिम, दलित मतांची आकडेवारी, सोशल मीडियावर लोकांकडून मागवलेली मते, काही बाहेरच्या एजन्सीकडून आलेले (मुद्दाम तयार केलेले) एक्झिट पोल, शेवटच्या क्षणांपर्यंत झालेले ‘लक्ष्मी’ दर्शन यांचा आधार घेत हा अंदाज वर्तवला जात आहे.
शिवसेनेची मते मिळावीत यासाठी भाजपने हि निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेऊन ठेवली. त्याला प्रत्युत्तर देताना दोन्ही काँग्रेसची पंचाईत झाली असली तरी शिवसेनेकडून मात्र त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. हिंदुत्वाचा हा गाजलेला मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरुणांत असलेले आकर्षण आणि शिवसेनेतील संभाव्य नाराजी यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. पण तीन दिवसांपासून व्यक्त होणारे अंदाज मात्र कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवणारे ठरत आहेत.
Web Title: Kolhapur Results Estimate Pay Estimates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..