ऐतिहासिक दसरा चौकात पारंपरिक उत्साहात कोल्हापुरचा शाही दसरा संपन्न

ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला.
ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला.sakal

कोल्हापूर : पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत आज ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा (Kolhapur Shahi Dasara) सोहळा साजरा झाला. परंपरेनुसार सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला. प्रत्येक वर्षी करमणुकीची साधने आणि खेळणी, विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे दसरा चौकाला जत्रेचे स्वरूप येते. यंदा मात्र या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने व दसरा महोत्सव समितीने घेतली. शहरातील दहा ठिकाणी स्क्रीनवरून आणि स्थानिक वाहिन्यांवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाले.

दरम्यान, विजया दशमी दसऱ्यानिमित्त श्री अंबाबाईची विजयरथ रूपात पूजा बांधण्यात आली. दसरा चौकात उभारलेल्या शामियान्यात खास निमंत्रित, वरिष्ठ शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक व्यवस्था होती. सव्वापाचच्या सुमारास भवानी मंडपातून पारंपरिक लवाजमा निघाला. श्री अंबाबाईची पालखीही सजवलेल्या वाहनातून आली. पावणेसहाच्या सुमारास पालख्यांचे दसरा चौकात आगमन झाल्यानंतर काही वेळातच नवीन राजवाड्यातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे, महाराज कुमार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, यशस्विनीराजे पोलिस संचलनातील वाहनांच्या ताफ्यासह "मेबॅक' मोटारीतून दसरा चौकात आले. करवीर संस्थान गीताच्या धूनवर पोलिस वाद्यवृंदाने त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन झाले. त्यानंतर इशाऱ्याच्या बंदुकीची फैरी झाडण्यात आली आणि उपस्थितांनी सोने लुटण्यासाठी (शमीची पाने) धाव घेतली. काही काळ सोने लुटण्यासाठी झटापट सुरू झाली आणि त्यानंतर त्याचे रूपांतर स्नेहभेटीत झाले. लुटलेले सोने एकमेकांना देत "सोने घ्या, सोन्यासारखे राहा,' अशा शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली.

ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला.
हिंदुस्तान म्हणजे देशभक्तीचा स्वत्व नसलेला देश; संभाजी भिडे

परंपरेनुसार या सोहळ्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे, महाराज कुमार मालोजीराजे जुन्या राजवाड्यात गेले. तेथे त्यांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तेथून अंबाबाईचे, पंचगंगा घाटावरील संस्थान शिवसागर स्मारकाचे दर्शन घेऊन ते नवीन राजवाड्यावर परतले. श्री अंबाबाईची पालखी मंदिरात जाण्यापूर्वी सिद्धार्थनगरात गेली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. दरम्यान, सोहळ्यासाठी माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, 'सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com