
कोल्हापूर : ‘सकाळ’ ४२ वा वर्धापन दिन ; माजी लष्करप्रमुख नरवणे प्रमुख पाहुणे
कोल्हापूर : बदलत्या तंत्रज्ञानावर स्वार होतानाच संस्कृती व परंपरा नेटाने पुढे नेणाऱ्या आणि त्याचवेळी तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठीही तेवढ्याच खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ४२ वा वर्धापन दिन येत्या सोमवारी (ता. १ ऑगस्ट) साजरा होणार आहे. भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ‘भारतासमोरची सुरक्षिततेची आव्हाने आणि संधी’ या विषयावर ते संवाद साधतील. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाचला मुख्य सोहळा होईल. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे वर्धापन दिनाचा जाहीर सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
गेली चार दशके ‘सकाळ’ने वर्धापन दिनाचे आगळेपण जपले आहे. वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या व्याख्यानांतून विविध विषयांवर मंथन घडविताना आजवर अनेक नामवंत वक्त्यांची प्रभावळ या सोहळ्याला लाभली. यंदा तीच परंपरा जनरल मनोज नरवणे पुढे नेणार आहेत. भारताचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली असून, युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवाया अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले आहे. हवाई दलात अधिकारी असलेले वडील मुकुंद आणि आई लेखिका सुधा यांच्याकडून त्यांना देशसेवेचे बाळकडू मिळाले आणि ते पुढे भारतीय लष्कराचा अविभाज्य भाग बनले.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. चीनशी संलग्न सुमारे चार हजार किलोमीटर लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली; तर दिल्ली एरिया जनरल ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘ऑपरेशन पवन’ वेळी श्रीलंकेत झालेल्या इंडियन पीस कीपिंग फोर्समध्येही ते सहभागी होते. म्यानमार दूतावासासह आसाम रायफल्सचे उत्तर-पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा विविध पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
नागालॅंडमध्ये सेवा बजावताना आलेल्या अनुभवांवर ते सध्या पीएच.डी. करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकांसह लष्करप्रमुखांकडून विशेष पदकाने त्यांचा गौरव झाला आहे. एकूणच, त्यांच्या संवादातून भारताच्या सुरक्षिततेविषयी सर्वांगीण मंथन घडणार आहे. ‘सकाळ’च्या परंपरेप्रमाणे कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार असून, सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.
‘सुरक्षा’ विशेषांक
वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षा’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होईल. स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेपासून देशाच्या सुरक्षितेतपर्यंतच्या विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम केलेल्या दहा कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा गौरवही मुख्य कार्यक्रमात होईल.
असे होतील कार्यक्रम...
सायंकाळी ५ ‘चला, दगड डोक्यात घेऊ या’ प्रदर्शनाचे उद्घाटन
सायंकाळी ५.३० मुख्य सोहळा, दहा कर्तृत्ववान व्यक्ती व
संस्थांचा गौरव