कोल्हापूर : ओढा नसताना साकव बांधकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओढा नसताना साकव बांधकाम

कोल्हापूर : ओढा नसताना साकव बांधकाम

राशिवडे बुद्रुक : तळाशी (ता. राधानगरी) येथील सार्वजनिक विहिरीच्या मार्गावर ओढा नसतानाही तो असल्याचे दाखवून साकव बांधून ३५ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे, अशी तक्रार येथील सागर पोवार व मारुतराव जाधव-गुरुजी यांनी केली आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी, अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पोवार व जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे, की गतवर्षी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडवा ओढा आहे. पावसाळ्यात या ओढ्याला पूर येतो व पलीकडे जाता येत नाही. गावांचा संपर्क तुटतो. यामुळे या ओढ्यावर शासनाकडून साकव बांधून मिळावे, असा ठराव पहिल्याच ग्रामपंचायत बैठकीमध्ये सत्तारूढ गटातर्फे करण्यात आला. शिवाय ओढ्यावर साकव मंजूर झाल्यास बांधकाम करण्यास हरकत नाही, असा दाखलाही ग्रामपंचायतीने देऊन देखभाल दुरुस्तीचे हमीपत्रही दिले. याबाबतची मागणी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे करून त्या संबंधित विभागाने नियोजन नियोजन मंडळाकडे याबाबत मागणी केली असता लगेच ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. घाईगडबडीने काम उरकण्यात आले. प्रत्यक्षात ओढा नसतानाही साकव बांधण्याचे काम पाहून येथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याबाबत चौकशीची मागणी केली असता ग्रामसेवक आणि सरपंचांनी खुलासा पत्र जोडून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पोवार व जाधव म्हणतात, ‘‘गेल्या नोव्हेंबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे कामासंबंधी तक्रार अर्ज केला. ओढा नसताना पूल कशावर बांधले, याचा खुलासाही मागितला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी अहवाल मागवून माहिती घेतली. ओढा नसताना साकव बांधून शासनाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केलीच शिवाय यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. ग्रामपंचायतीसह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही सहभागी आहेत. त्‍याची तातडीने चौकशी करून संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करावी. याप्रसंगी मालोजी जाधव, हंबीरराव जाधव उपस्थित होते.

सरपंच हेही ठेकेदार आहेत. त्यामुळे त्यांनी अन्यत्र बांधलेल्या कामांचीही चौकशी करून त्याचा दर्जाही तपासावा, अशी मागणी मारुतराव जाधव यांनी केली.

चाळीस वर्षांची सत्ता हातातून गेल्यामुळे राजकीय द्वेषापोटी ही तक्रार आहे. त्यांच्या कामांची चौकशी केल्यास भ्रष्टाचार बाहेर पडेल. १४ वा वित्त आयोग तपासला तरी भानगडी बाहेर येतील. पिण्याच्या विहिरीत सांडपाणी मिसळत होते. ते रोखले. त्याने जनता समाधानी आहे. आजवर दूषित पाण्यामुळे येणारे साथीचे रोग थांबले. माझी बदनामी केल्यास ३५ लाखांचा अब्रू नुकसानीचा दावा करू.

- चंद्रकांत जाधव, सरपंच तळाशी

Web Title: Kolhapur Sakav Construction Without Flood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top