esakal | Kolhapur : घर पडझड अनुदान कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : घर पडझड अनुदान कधी?

Kolhapur : घर पडझड अनुदान कधी?

sakal_logo
By
गणेश शिंदे -सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : महापुराने शिरोळ तालुक्यातील ४३ गावे बाधित झाली. या गावातील १४ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. ४२० घरांची अंशत: पडझड झाली आहे. दोन महिने उलटली तरी घर पडझडीतील ४३४ पूरग्रस्त कुटुंबांना अद्याप मदत मिळालेली नाही. यातील अनेक कुटुंबांनी भाड्याच्या घरात संसार थाटला आहे. मदतीनंतरच त्यांना हक्काच्या घरात जाता येणार असल्याने त्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात नऊ हजार ९५ घरे जमीनदोस्त झाली होती. बाधितांना शासनाने ९५ हजारांची मदत दिली होती. मात्र, यंदाच्या महापुरात घरे जमीनदोस्त होऊन दोन महिने उलटले तरी घर पडझडीतील कुटुंबांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली दीड लाख रुपयांची मदत लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात ४३ गावांत आलेल्या महापुरात शेती, घरे, व्यापारी, व्यवसाय यासह सर्वच घटकांना फटका बसला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील नऊ हजार ९५ घरे अंशतः व पूर्णतः पडली होती. त्याचबरोबर एक हजार ९२१ जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले होते. यंदाच्या महापुरात १४ घरे पूर्णतः व ४२० घरे अंशत: पडली आहेत. अद्याप पूरबाधित कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. अशातच घरे पडझड झालेल्यांनाही अनुदान अद्याप देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांत नाराजीचा सूर उमटत आहे.

कुटुंबांची परवड

ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरात नऊ हजार ९५ घरे जमीनदोस्त झाली होती. यातील काही लाभार्थी वंचित आहेत. याची चौकशी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी लावली आहे. त्याचबरोबर ९५ हजार रुपयांमध्ये घर बांधून होऊ शकत नाही. त्यामुळे अद्यापही कुटुंबे बेघर आहेत. शिवाय, बांधकामाच्या साहित्याचे दर गगनाला भिडल्याने नवी घरे कशी उभी राहायची? शिवाय, शासनाने जाहीर केलेली मदतही अद्याप दिली नाही. त्यामुळे या महापुरात घरांची पडझड झालेल्या कुटुंबांची चिंता वाढली आहे.

महापुरात अंशतः व पूर्णतः पडझड झालेल्या घरांचे पंचनामे पूर्ण करून याचा अहवाल पाठविला आहे. अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, शिरोळ

महापुरात घराचे नुकसान झाले. पंचनामा केला. मात्र, अद्याप मदत मिळाली नाही. वारंवार विचारणा करीत आहे. मात्र, केवळ आश्वासने मिळत आहेत.

- राहुल काकडे, पूरग्रस्त

दृष्टिक्षेप

बाधित गावे : ४३

पूर्णतः घरांची पडझड : १४

अंशतः घरांची पडझड : ४२०

loading image
go to top