
कोल्हापूर : शहरात शिवजयंतीचा माहोल
कोल्हापूर : शहरातील विविध तालीम संस्थांसह मंडळांनी शिवजयंती दिमाखात साजरी करण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे.शिवरायांच्या पुतळ्याचे मिरवणुकीने स्वागत संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे देवल क्लब इथून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाच्या ठेक्याने मिरवणुकीची रंगत वाढवली. बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरीमार्गे पुन्हा बिंदू चौक येथे मिरवणूक आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष येथे करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी महापौर रामभाऊ फाळके, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, सत्यजित कदम, जयेश कदम यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी अध्यक्ष सुमीत पवार, उपाध्यक्ष संदीप पाटील, खजिनदार सोनल घोटणे, सचिव कपील यादव, ओंकार खराडे, संजय तोरस्कर, रतन हुलस्वार, प्रवीण सोनवणे, रवी पाटील, अप्पा लाड, बाळासाहेब मुधोळकर, विनायक चंदुगडे, महेश ढवळे उपस्थित होते.
शंभूराजे पोवाडा नाट्याने शिवप्रेमी स्तब्ध
संयुक्त जुना बुधवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे तोरस्कर चौकात शिवजयंती सोहळ्यासाठी स्टेज उभारले आहे. संभाजी महाराज यांची बुद्धिमत्ता, शत्रूशी लढण्याचे धैर्य, उत्तम राज्य कारभाराची सूत्रबद्ध मांडणी करत शिवप्रेमींना शंभूराजे पोवाडा नाट्याने खिळवून ठेवले. शाहीर रंगराव पाटील यांच्या भेदक शाहिरीला टाळ्यांची दाद मिळाली. त्याचे लेखन युवराज पाटील, तर युवराज ओतारी यांनी दिग्दर्शन केले. सागर माने, प्रथमेश लोहार, पराग निट्टूरकर, सखाराम चौगले, दीपक खटावकर, प्रणोती कुमठेकर, दिव्या टोणपे, ऋग्वेद निकम, प्रतीक साठे या कलाकारांनी उत्तम अभिनय केला. बाळासाहेब खांडेकर हार्मोनियम, दयानंद कांबळे ढोलकी, लक्ष्मण पाटील, ईश्वरा बोराटे, कृष्णात जाधव, रणजित सुतार, गणेश वाईंगडे यांनी संगीत साथ दिली.
शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके
संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे मिरजकर तिकटी येथे शिवजयंती सोहळ्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, यशराजे छत्रपती, ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर झाली. प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. खंडोबा-वेताळ, शिवबाचा मावळा, हिंद प्रतिष्ठान, ताराराणीसह अन्य संघांचा यात सहभाग होता. या वेळी गोपी पोवार, ऋत्विक गवळी, प्रसाद खोराटे, आर्यनिल जाधव, स्वरूप निंबाळकर, अनिकेत घोटणे, सौरभ गवळी, प्रथमश भोसले, अजिंक्य साळोखे, प्रथमेश मोहिते उपस्थित होते.
Web Title: Kolhapur Shiva Jayanti Atmosphere City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..