कोल्हापूर : मतदान मतपत्रिकेवर घ्या ; श्रीकांत देशपांडे

राजकीय पक्षांची मागणी; निवडणूक अधिकारी देशपांडेंनी घेतला आढावा
 ballot paper
ballot papersakal

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. ही निवडणूक मशिनद्वारे होईल. या मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर आणि जेवणावळी घालणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई होईल. याशिवाय, ज्या उमेदवारावर गुन्हा नोंद आहे, त्यांनी किंवा संबंधित पक्षांनी तो उमेदवार कशाबद्दल निवडणूक लढविणार याची वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागणार असल्याची माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिली. उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक शांततेत व्हावी, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना श्री. देशपांडे यांनी दिल्या.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

श्री. देशपांडे म्हणाले, ‘‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान आवश्यक आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जनजागृती करावी. कोल्हापूरमध्ये शांततेत निवडणुका पार होतात. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल आणि निवडणूक शांततेत होईल. गर्दी असणाऱ्या मतदान केंद्र ठिकाणी अधिक पोलिस बंदोबस्त ठेवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर ठेवला पाहिजे. मतदारांना मतदान केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार यांच्यासह सर्व मतदारांसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सुविधा द्या. मतदानविषयक कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा, मतदान साहित्य वेळेत उपलब्ध करून द्या, कर्मचाऱ्यांना वेळेत प्रशिक्षण द्यावे.’’

दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘पोटनिवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रशासन सज्ज असून पोटनिवडणूक शांततेत होईल.’’ जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये आचारसंहिता कालावधीत निवडणुकीच्या अनुषंगाने चार दखलपात्र, तर चार अदखलपात्र गुन्हे होते. उत्तर पोटनिवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) मंगेश चव्हाण नोडल अधिकारी आहेत. भरारी पथके (एफएसटी), स्थिर निगराणी पथक (एसएसटी), व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी) आहेत.’’

कोल्हापूर उत्तरसाठी दोन अर्ज

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दोन अर्ज दाखल झाले आहेत. राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पक्ष) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल केले; तर आतापर्यंत ३९ उमेदवारांनी ८४ अर्ज नेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com