
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या दूध वाहतुकीसाठी तीन निविदा
कोल्हापूर: गोकुळ निवडणुकीत गाजलेला भाड्याच्या टँकरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गोकुळने दूूध वाहतुकीसाठी सहकारी तत्त्वावावरील वाहतूक संस्थांकडून निविदा मागवल्या होत्या, त्यात तीन संस्थांच्या निविदा आल्या असून अपेक्षित टँकरची संख्या नसल्याने दोन संस्थांच्या निविदा अपात्र ठरल्या तर माजी संचालकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एकमेव संस्था पात्र ठरली आहे. दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची व्यंकटेश्वर कंपनी सहकार तत्त्वावरील नोंदणीकृत्त संस्था नसल्याने त्यांना निविदाच भरता आली नसल्याचे समजते.
‘गोकुळ’ने कोल्हापुरातून नवी मुंबईतील प्रकल्प, महानंद, गोरेगांव व पुणे येथील पॅकेज सेंटरसह जिल्ह्यातील संघाच्या चिलिंग सेंटरवरून दूध संकलित करून ते संघाच्या गोकुळ शिरगांव येथील प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी सहकारी तत्त्वावरील संस्थांकडून मार्चमध्ये निविदा मागवल्या होत्या. १ मे २०२२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत दररोज किमान नऊ लाख लिटर्स दुधाची वाहतूक करण्यासाठी हे टँकर मागवले होते. किमान शंभर टँकर असलेल्या संस्था यात पात्र ठरणार होत्या.
यासाठी कोऱ्या निविदा २१ ते २९ मार्च या कालावधी प्रती निविदा दहा हजार रुपयांप्रमाणे वितरीत करण्यात आल्या होत्या. २९ मार्च हा निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. निविदेसोबत एक कोटी बयाणा रक्कम भरण्याची अट होती. या निर्धारित कालावधीत वारणा दूध वाहतूक संस्था, माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांची विठ्ठल-रखुमाई दूध वाहतूक संस्था व शेतकरी सहकारी दूध वाहतूक संस्था अशा तीन संस्थांच्या निविदा आल्या होत्या. यापैकी वारणा व विठ्ठल-रखुमाई संस्थेकडे संघाला आवश्यक शंभर टँकर नसल्याने या दोन्हीही संस्थांच्या निविदा अपात्र ठरल्या. शेतकरी सहकारी वाहतूक संस्था ही संघाच्या माजी संचालकांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे.
टँकर वाहतूक कळीचा मुद्दा
‘गोकुळ’कडे टँकर असणे म्हणजे प्रतिष्ठा होती. त्यातून काही ठराविक जणांच्या टँकरची संख्या मोठी तर होतीच पण राजकीय दबावापोटी हे टँकर नंबराशिवाय भरून जात होते, त्यांना थेट पास होता. त्यातून टँकर हा विषय कळीचा मुद्दा झाला होता. गेल्यावर्षी झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. संघात जे सत्तांतर झाले, त्याला कारणीभूत अनेक कारणांपैकी टँकर हे एक कारण होते. आता नव्या प्रक्रियेत कोणाला जास्त टँकर मिळणार हाही चर्चेचा विषय ठरणार आहे.
Web Title: Kolhapur Three Tenders Transport Gokul Milk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..