
कोल्हापूर : तांत्रिक कारण सांगून दुप्पट पैशाची मागणी
कोल्हापूर : तुमचा फास्टॅगचा रिचार्ज संपला आहे. खात्यावर बॅलन्स नसेल यासारखी कारणे सांगून किणी व तासवडे टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट सुरू आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली वाहने जाणीवपूर्वक अडवून त्यांच्याकडून रोख स्वरूपात दुप्पट पैशाची वसुली तर होतेच; पण टोल सोडून पुढे गेल्यानंतर त्याच वाहनचालकाच्या बँक खात्यावरूनही पैसे कपात होत आहेत, अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, या टोलधाडीला आळा कोण घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूर-पुणे मार्गावर किणी व तासवडे या दोन टोल नाक्यावर असे सर्रास प्रकार सुरू आहेत. एखादी चारचाकी आली की त्याच्या आडवेच टोल वसुली कर्मचारी उभे राहतात. वाहनांसमोरच फास्टॅग सुरू आहे किंवा नाही हे दिसणारी स्क्रिन आहे. त्याच्यासमोरच हा कर्मचारी उभा राहतो. त्यामुळे वाहनांवरील फास्टॅगचे स्टिकर स्कॅन होत नाही आणि हाच मुद्दा पुढे करून तुमचा फास्टॅग ॲिक्टव्ह नाही, तुमच्या खात्यावर रक्कम नाही यासारखी कारणे सांगून तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल, असे या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. वाहनचालक खुलासा करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर अशा वाहनचालकांना दादागिरी केली जाते. उगाच वाद नको म्हणून काही वाहनचालक दुप्पट रक्कम भरून पुढे जातात. काही अंतरावर गेल्यानंतर संबंधिताला टोलची रक्कम तुमच्या खात्यातून कपात झाल्याचा बँकेचा मेसेज येतो. यातून जादाचा भुर्दंड वाहनचालकांना सोसावालागत आहे.
फास्टॅग सुरू झाल्यापासून असे प्रकार या दोन नाक्यांवर सुरू आहेत. जाब विचारणाऱ्यांना दादागिरी केली जाते; पण एखाद्याने वाद घातला तर मात्र त्यांच्या वाहनांचा फास्टॅग लगेच कसा स्कॅन होतो, हा खरा प्रश्न आहे. काही वाहनचालकांनी व्हिडिओद्वारे या दोन नाक्यावर होणारी लूट समोर आणली आहे. ९ मे रोजी या मार्गावरून प्रवास केलेल्या वाहनचालकाने आलेला अनुभव व्हिडिओतून सांगितला आहे.
या नाक्यावर एकवेळच्या प्रवासासाठी ७५ रुपये घेतले जातात, फास्टॅग ॲिक्टव्ह नसल्याचे कारण सांगून वाहनचालकांकडून दुप्पट म्हणजे १५० रुपये वसूल केले जातात; पण हेच वाहन काही अंतरावर गेल्यानंतर बँकेतूनही पैसे कपात झाल्याचा संदेश येतो. अशा प्रकारे एका वाहनचालकाकडून २२५ रुपयांची लूट या टोल नाक्यावर सुरू आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आहे. त्या संदर्भात आजच पुणे येथे या दोन टोल नाक्याच्या ठेकेदारांची बैठक घेतली. या विषयावरील चर्चेसाठीच ही बैठक घेण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे असा प्रकार घडल्याचे टोल ठेकेदारांनी सांगितले. पुन्हा अशा तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
- वसंत पंदारकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
Web Title: Kolhapur Toll Naka Double Money Technical
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..