Kolhapur: उद्याची सर्वसाधारण सभा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur ZP

कोल्‍हापूर : उद्याची सर्वसाधारण सभा रद्द

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेची येत्या शुक्रवारी (ता. १२) होणारी सर्वसाधारण सभा रद्द केली आहे. प्रशासनाने जिल्‍हाधिकाऱ्यांकडे याबाबत मार्गदर्शन मागवले होते. त्यावर जिल्‍हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली असून जिल्‍हा परिषद सदस्य मतदार आहेत. जर सभा झाली तर चर्चेवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने आचारसंहिता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच सभा आचारसंहिता संपल्यानंतर घ्याव्यात, असे आदेश जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रशासनाने सभा रद्दचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचे सांगत निर्णयाचा विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी निषेध केला आहे.

शुक्रवारच्या सभेबाबतचा पत्रव्यवहारही झाला आहे; मात्र सोमवारी (ता. ८) अचानकच आचारसंहितेची घोषणा केली. त्यामुळे सर्वसाधारण सभा तसेच बुधवारची (ता. १०) जलव्यवस्‍थापन समिती सभा घ्यायची किंवा कसे, याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागवले होते. यावर या दोन्‍हीही सभा न घेण्याचे आदेश जिल्‍हाधिकाऱ्यांनी आज दिले. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

साडेचार वर्षात विधानसभा, लोकसभा निवडणूक झाली. त्या वेळीही सर्वसाधारण सभा झाली. मग आताच सभा रद्द करण्याचे कारण काय? सभेत धोरणात्‍मक निर्णय घेता येणार नाही, याची सदस्यांना कल्‍पना आहे; मात्र विकास कामांचा आढावा घ्यायला हरकत असण्याचे कारण नाही. सभा रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. या प्रकरणी दाद मागण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.

अधिकाऱ्‍यांना कामाचा आधीच उल्‍हास आहे. कामे वेळेत केली जात नाहीत. जाब विचारला असता काहीतरी वेळ मारून नेणारे उत्तर दिले जाते. आताही आचारसंहितेचा बाऊ करून जलव्यवस्‍थापन व सर्वसाधारण सभा रद्द केली. धोरणात्‍मक निर्णय झाले नाही तरी विकासकामांचा आढावा घ्यायला काहीच अडचण नाही; मात्र अधिकारी अडचणीत येत असल्याने सभा रद्द केली आहे.

- प्रा. शिवाजी मोरे, जलव्यवस्‍थापन समिती सदस्य

अनेक अधिकारी, पदाधिकारी व मंत्र्यांच्या नावे पावत्या फाडत आहेत. बदल्या, पदोन्नती, प्रतिनियुक्‍ती, सदस्यांच्या पत्रांना उत्तर न देणे, पदाधिकाऱ्यांचा अवमान असे प्रकार घडले आहेत. यात वरिष्‍ठ अधिकारीच दोषी आहेत. त्याचा सभेत जाब विचारला जाणार होता. त्यामुळेच सभा रद्द केली असून सदस्य व सभागृहाचा हा अवमान आहे. या प्रवृत्तीचा निषेध करतो.

- राजवर्धन निंबाळकर, सदस्य

loading image
go to top