कोल्हापूर : शहरात वृक्षसंपदा बहरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree

कोल्हापूर : शहरात वृक्षसंपदा बहरली

कोल्हापूर : शहरामध्ये नागरिक वृक्ष संवर्धनाबाबत जागरूक आहेत. विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पूर्वापर असणारी वृक्षसंपदा जोपासली आहे. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरातील जैवविविधता अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये शहरात विविध प्रकारची ५ लाख ६२ हजार ९५४ वृक्ष असल्याची नोंद आहे. काही दुर्मिळ प्रजांतींचाही यात समावेश आहे. २००९ मध्ये झालेल्या वृक्षगणनेमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

अहवालात वृक्षांची वर्गवारी त्यांच्या संख्येनुसार केली आहे. शहरामध्ये ज्या प्रजातींची संख्या १ ते १० आहे अशा ३१६ दुर्मीळ (शहरामध्ये दुर्मीळ) प्रजातींचे वृक्ष आहेत. ११ ते १०० संख्येत आढळणारे २१५८ वृक्ष आहेत. शंभर ते पाचशे असे असणारे १२, ४०१ वृक्ष आहेत. पाचशे ते हजार या संख्येत आढळणारे १२,२९५ वृक्ष आहेत आणि हजारच्या पुढे असणारे सुमारे ५ लाख ३५ हजार ७८४ वृक्ष आहेत. सर्व मिळून शहरात नोंदवलेल्या झाडांची एकूण संख्या ५ लाख ६२ हजार ९५४ इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षांची संख्या हे प्रमाण तुलनेने सुस्थितीत आहे. डाळींब, जांभूळ, शेवगा, सुपारी, सीतापळ, रामफळ, इडलिंबू, नारळ, आंबा, पेरू, चिक्कू, केळी, फणस, चिंच ही फळझाडे तर शहरात आहेतच.

याचसोबत गवती चहा, नागरमोथा, अडुळसा, अश्वगंधा, ब्राह्मी, अडुळसा, नीरगुडी, बेल, वाळा, नाग केसर, गुळवेल अशा औषधी वनस्पतीही पहायला मिळतात. विविध प्रकारच्या वेली, झुडपे, गवतवर्गीय वनस्पतीही विपूल प्रमाणात आहेत. शहरात ५४ सार्वजनिक उद्याने आहेत. शहराच्या एकूण भूभागापैकी ३५०० एकर जागा या उद्यानांनी व्यापली आहे.

विद्यापीठाच्या ८५३ एकर जागेवर गर्द वनराई आहे. येथे विविध प्रकारचे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, ससा, रानमांजर यांसारखे प्राणी आहेत. टाऊन हॉल बाग, शेंडापार्क येथील ऑक्सिजन पार्क यासारख्या ठिकाणी दाट वनराई आहे. मध्यवस्तीमध्येही झाडांचे प्रमाण बरे आहे. वृक्षसंवर्धनबाबत नागरिक व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटना जागरूक आणि कार्यरत आहेत.

वृक्षगणना केल्यानंतर शहरातील वृक्षसंपदेची सद्यस्‍थिती समोर येईल. सध्या असणाऱ्या झाडांमध्ये विदेशी प्रजातीही आहेत. या स्थानिक इकॉलॉजीशी सुसंगत नाहीत. त्यामुळे देशी झाडे लावणे आवश्यक आहे. पाणथल जागा, दलदली, गवताळ कुरणे ही ठिकाणी म्हणजे ‘अर्बन विल्डरनेस’ आहेत. ही ठिकाणे जपणे व जैवविविधतेचे संवर्धन करण्याची गरज आहे.

- उदय गायकवाड,ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: Kolhapur Tree Wealth Flourished City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..