Kolhapur News धरणग्रस्तांना गरज पाठबळाची | kolhapur victims support Donors forward food dam protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest

Kolhapur News : धरणग्रस्तांना गरज पाठबळाची

कोल्हापूर : त्यांनी सर्वांच्या विकासासाठी आपले सर्वस्व दिले. त्यामुळे धरणे झाली, धरणाच्या पाण्याने दुर्भिक्ष्‍य असणारे भाग सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाले. पण, ज्यांनी जमिनी, घरे धरणासाठी दिले, त्यांच्या नशिबी मात्र उपेक्षितांचे जगणे आले. त्यांची चौथी पिढी आता हक्कासाठी आंदोलन करीत आहे.

त्यांच्या आंदोलनाला समाजाने पाठिंबा देणे गरजेचे आहे. किमान धरणग्रस्तांच्या भोजनाची आणि अन्य व्यवस्था झाली, तरी त्यांना आधार मिळेल. त्यांची आबाळ थांबेल. यासाठी दानशूर कोल्हापूरकरांनी पुढे येणे आवश्यक आहे.

राज्यातील धरणांसाठी अनेक गावे विस्थापित झाली. शासनाने त्यांना पुनर्वसनाचे आश्‍वासन दिले होते. काहींचे पुनर्वसन झाले; पण बहुतांश धरणग्रस्तांच्या वाट्याला उपेक्षेचे जगणे आले. या विरोधात गेल्या १० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलन करीत आहेत.

त्यांच्या जेवणाची आबाळ होत आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन त्यांच्या भोजनाची आणि अन्य व्यवस्थांची जबाबदारी घेतली, तर त्यांच्या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा मिळेल. ज्यांनी आपल्यासाठी सर्वस्व गमावले, त्यांच्यासाठी काही तरी करण्याची संधी समाजाला मिळाली आहे. ज्यांना धरणग्रस्तांना मदत करायची आहे, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंदोलकांशी संपर्क करावा.

आंदोलनाचा १० वा दिवस

श्रमिक मुक्ती दलातर्फे सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आज १० वा दिवस होता. या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन कमिटीची बैठक झाली. बैठकीत गोठणे, जैनापूर, दानोळी, तनाळी, नरंदे, सोनार्ली, भेंडवडे, चांदेल-भादोले या गावांना २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचे नियोजन बैठकीत करण्यात आले. या वेळी वन विभागाचे अधिकारी रमेश कांबळे व श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.