
कोल्हापूर : खांब उभे आहेत; पण टाकीचे बांधकाम अर्धवट सोडलेले, कॉलनीतील एका गल्लीत पाईप टाकली असली तरी शेजारील दुसऱ्या गल्लीत पत्ता नाही, कुठे पाईपलाईनच्या जोडण्यासाठी केलेली खोदाई आहे, असे ‘अमृत’ योजनेतील पाणीपुरवठ्याच्या कामांचे तीन तेरा वाजले आहेत. कामाची मुदत संपून दोन वर्षे होत आली, तरी ५८ टक्क्यांवर काम केलेले नाही. पाच महिन्यांपासून सर्व ठप्प असूनही प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही. अंतिम टप्प्यात असलेल्या थेट पाईपलाईनचे पाणी जरी वर्षअखेरीस आले तरी ‘अमृत’च्या घोळामुळे ते पाणी नागरिकांच्या मुखात कितपत पडणार, याची साशंकताच आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी थेट पाईपलाईन योजना राबवली जात आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘अमृत’ योजनेतून पाणी साठवणीच्या टाकी, मुख्य तसेच अंतर्गत वितरण नलिका टाकण्याचे नियोजन केले. त्यासाठी ११४ कोटी ८१ लाखांच्या कामांना मंजुरी दिली. त्यातून १२ टाकी तसेच ४२५ किलोमीटर लांबीच्या वितरण नलिका टाकण्यात येणार होत्या. २०१८ मध्ये वर्कऑर्डर दिल्यावर दिमाखात काम सुरू झाले; पण त्यावर नियंत्रण नसल्याने काम भरकटले.
सब कंत्राटदार जास्त झाल्याने मेळ बसला नाही व त्याचा परिणाम सर्व कामावर झाला. अनेक भागांत जुन्या पाईपबरोबर नवीन पाईप जोडले आहेत. त्याचे कनेक्शन दिले आहेत; पण दोन्ही पाईप सुरू असल्याचे प्रकार असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अनेक ठिकाणी पाईप टाकण्याचे काम अपूर्ण आहे. काही ठिकाणी अर्ध्या कॉलनीत पाईप टाकले आहेत. अनेक ठिकाणी कनेक्शनचे पाईप रस्त्यावर उघडे आहेत. त्यातून बिन बिलाचे पाणी वापरता येते.
जुन्या वितरण व्यवस्थेतून एकाच टाकीद्वारे पाणी दिले जात होते. थेट पाईपलाईनचे पाणी आले की वेगवेगळ्या टाकींद्वारे पाणी दिले जावे, यासाठी नियोजन केले. त्यातून १२ उंच टाक्या बांधण्याचे ठरविले होते. बाराही टाक्यांचे काम अर्धवट राहिले आहे. काही ठिकाणी फक्त खांब उभे केले आहेत, त्यावरील काम पुढे गेलेलेच नाही. काही ठिकाणी सारेच अर्धवट राहिले आहे. या टाक्यांना जुन्या मुख्य वितरण वाहिनीवरून लोखंडी पाईपद्वारे कनेक्शन द्यायचे आहे. अजून टाकींचेच काम पूर्ण नसल्याने या कामांना हातच लावलेला नाही. वर्कऑर्डरप्रमाणे ऑगस्ट २०२० मध्ये कामाची मुदत संपली आहे.
१२ अपूर्ण टाकी
बोंद्रेनगर आपटेनगर पुईखडी राजेंद्रनगर सम्राटनगर शिवाजी पार्क ताराबाई पार्क कसबा बावडा कदमवाडी राजारामपुरी ९ नंबर शाळा सायबर गोळीबार मैदान
काम बंद असल्याने कंत्राटदाराकडे पाठपुरावा केला. पण, त्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दंड प्रस्तावित केला आहे. त्यानुसार नोटीस देऊन आता पुढील कारवाई केली जाईल.
- हर्षजित घाटगे, जल अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.