
कोल्हापूर : जरगनगर परिसराचे पाणी पाच दिवस राहणार बंद
कोल्हापूर : निर्माण चौकातील पंपात झालेला बिघाड दूर झाला नसल्याने जरगनगर परिसरातील नागरिकांना आणखी पाच दिवस पाणीपुरवठा होणार नाही. तीन दिवसांपासून पंप बंद असून, दुरुस्ती झालेली नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात जरगनगर परिसरात टॅंकरद्वारे पाणी दिले जात असून, नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पाण्याच्या खासगी टॅंकरची मागणी वाढली असून, त्यांनी दर वाढविले आहेत.
शिंगणापूर योजनेतील पुईखडी ते राजारामपुरीकडे जाणाऱ्या ११०० मिलिमीटर व्यासाच्या गुरुत्वनलिकेवरून निर्माण चौक येथून जरगनगर व संलग्नित परिसराला पंपिंगने पाणीपुरवठा केला जातो. या पंपात मंगळवारी (ता. २६)पासून बिघाड झाला. जरगनगर व संलग्नित परिसराचा पाणीपुरवठा बंद आहे. पंप १२ वर्षे जुना असल्याने पंपाची दुरुस्ती करणारे मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुरुस्तीला आणखी पाच दिवस लागणार आहेत. जरगनगर व परिसर उंचावर आहे. तिथे मुळात रोज योग्य दाबाने पाणी येण्यासाठी झगडा करावा लागत होता. आता तर पाणीच नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या भागात कळंबा फिल्टर येथून टँकरद्वारे पाणी दिले जाते. महापालिकेच्या टॅंकरमधून बादली वा कळशीद्वारे पाणी भरावे लागत असल्याने नागरिकांना रोज टॅंकरमधून पाणी भरण्याचा त्रास होत आहे.
Web Title: Kolhapur Water Jarganagar Closed Five Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..