esakal | गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन धरले जात नसल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या गूळ उत्पादक व व्यापाऱ्यांच्या वादात आज सलग तिसऱ्या दिवशी सौदे बंद राहिले.

व्यापाऱ्यांनी खरेदीच थांबवल्याने पेच निर्माण झाला. गूळ उत्पादकांनी जोरदार वाद केला. अखेर शेतकऱ्यांनी रव्यांच्या बॉक्ससह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली, पुन्हा शेतकरी बाजार समितीत आले. बैठक झाली. यावेळी दुपारपर्यंत खडाजंगी चर्चा झाली. यात बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा निघाला. त्यानुसार सोमवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

शाहू मार्केट यार्डात शेतकरी गूळ घेऊन येतात, तो सौद्याला लावल्यानंतर गुळाच्या बॉक्सचे वजन केले जाते. यातील फक्त गुळाचे वजन धरून गुळाचे पैसे दिले जातात; मात्र बॉक्सचे वजन धरले जात नसल्याने पैसे मिळत नाहीत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बॉक्सचे वजन गृहीत धरून त्याचेही पैसे द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे; मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यावरून दोन दिवस व्यापारी व गूळ उत्पादक शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. या बाजार समितीने काल गुळाच्या बॉक्सचे वजन धरले जावे, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज सौदे होणार होते. सकाळी अनेक शेतकरी रवे घेऊन बाजारपेठेत आले; मात्र व्यापारी सौद्यासाठी आले नाहीत. गुळाची खरेदी होऊ शकली नाही. माल पडून राहतोय हे दिसताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी गुळाच्या गाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याची माहिती जिल्हा सहकार निबंधकांना दिली. सहकार निबंधक अमर शिंदे यांच्या उपस्थितीत बाजार समितीत शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. तिथे बॉक्सचे वजन सौद्यात धरावे, त्याचे पैसे द्यावे असे ठरले. मंडळ सदस्य प्रा. जालंदर पाटील, नामदेव पाटील, मानसिंग पाटील व सचिव जयवंत पाटील, व्यापारी प्रतिनिधी नीलेश पटेल, विष्णू पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी घेतली स्वतंत्र बैठक

यंदाच्या गूळ हंगामात गुळाला सरासरी ३६०० ते ३७०० क्विंटल भाव आहे. बहुतांश गूळ गुजरातला जातो; मात्र तेथेही स्पर्धा असल्याने गुळाची मागणी कमी झाली. त्यामुळे जास्त दर देण्यासोबत बॉक्सचे पैसे देणेही परवडत नाही; मात्र चांगल्या गुळाला चांगला भाव देण्याचा व्यापारी प्रयत्न करतील, असे मुद्दे व्यापाऱ्यांनी स्वतंत्ररीत्या घेतलेल्या बैठकीत चर्चिले गेले.

loading image
go to top