
कोल्हापूर : लाभापासून ११०० शेतकरी वंचित
कुडित्रे : गतवर्षी जुलै २०२१ ला आलेल्या महापूर, अतिवृष्टीने करवीर तालुक्यातील ३९ हजार २३४ शेतकऱ्यांचे १० हजार २२८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. याची भरपाई दोन टप्प्यात १३ कोटी मिळाल्याचा दावा तालुका कृषी खात्याने केला आहे. दरम्यान, खाते सामायिक, एकत्र शेती या कारणामुळे तालुक्यात सुमारे ११०० शेतकरी अद्याप भरपाईपासून वंचित आहेत.
आलेल्या महापूर, अतिवृष्टी, भूस्खलनाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात जिरायत ५४०८ शेतकऱ्यांचे ७२८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बागायत पिकाखाली ३३ हजार ८२३ शेतकऱ्यांचे ९५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. फळ पिकाखाली तीन शेतकऱ्यांचे ३९ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगरात २२ गावांत भूस्खलन होऊन जमीन खचली होती. यात ३० हेक्टर ८५ एकर जमिनीचे भूस्खलन झाले. अतिवृष्टीमुळे सव्वा एकर जमिनीवर गाळ साचल्याने जमीन कसण्यास योग्य राहिली नाही. असे तालुक्यात ३९ हजार २३४ शेतकऱ्यांचे १० हजार २२८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी सुमारे १४ कोटी निधीची अपेक्षा होती. पहिल्या टप्प्यात ११ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात दोन कोटी अशी सुमारे १३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
दरम्यान, तालुक्यात सुमारे ११०० शेतकऱ्यांची एकत्र शेती, सामायिक खाते असल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ देता आला नाही. अनेक विहिरी गाळाने बुजल्या, त्यापैकी १८ विहिरींना निधी मंजूर झाला, मात्र महसूल विभागाने पंचनामा केला असताना पुन्हा दुसरे पत्र देण्याची गरज नाही, असे ते लोकप्रतिनिधींना सांगतात, गटविकास अधिकारी पत्र पाहिजे, असा सल्ला देतात. कृषी खात्याकडून अपडेट माहिती दिली जाते, मात्र करवीर तहसील खात्याकडून माहिती देण्यात चालढकल केली जाते. यामुळे पूरग्रस्तांचे हेलपाटे सुरू आहेत.
गतवर्षी जुलैमध्ये आलेल्या महापुराने आणि अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. लाखो एकर शेतीसह अनेक घरे, जनावरे गाडली गेली. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे झाले, मदतही जाहीर झाली. यातील काहींना मदत मिळाली, तर काही पूरग्रस्त, शेतकरी अद्यापही वंचित आहेत. लोकप्रतिनिधींनी यात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र यंदाचा पावसाळा तोंडावर आला तरी यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. शेतीची मिळालेली नुकसानभरपाई, सानुग्रह अनुदान आणि अद्यापही वंचित असलेले पूरग्रस्त असा महापुराचा लेखाजोगा मांडणारी मालिका आजपासून...