esakal | कोवाडला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अजेंड्यावर

बोलून बातमी शोधा

In Kowad The issue of traffic congestion is on the agenda Kolhapur Marathi News

कोवाड बाजारपेठेतील चर्चेत असलेला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ग्रामपंचायतीने अजेंड्यावर घेतला आहे. दुकानदारांसह गाडे व बैठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाला लगाम लावला.

कोवाडला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अजेंड्यावर
sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : कोवाड बाजारपेठेतील चर्चेत असलेला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ग्रामपंचायतीने अजेंड्यावर घेतला आहे. दुकानदारांसह गाडे व बैठ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणाला लगाम लावला. बाजारपेठेतील दुकानांसमोर पांढरे पट्टे मारून व्यापाऱ्यांना जागा निश्‍चित करून दिल्याने वाहतूक कोंडीचा बहुतांश प्रश्‍न मार्गी लागला आहे. आता पार्किंगला शिस्त लागली की बाजारपेठेतील वाहतूक सुरक्षित होण्याला मदत होईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या या विधायक निर्णयाने नागरिकांतून समाधान व्यक्त होते. 

तालुक्‍यातील मोठी बाजारपेठ म्हणून कोवाड बाजारपेठेकडे पाहिले जाते. तीस ते चाळीस खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नेहमी येथे लोकांची गर्दी असते. पण, वाहतूक कोंडीने सर्वांचीच डोकेदुखी निर्माण केली आहे. व्यापाऱ्यांचे दिवसेंदिवस रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण, जागा मिळेल त्याठिकाणी होत असलेला व्यापार, आठवडे बाजारातील विक्रेत्यांची चढाओढ, बेशिस्त पार्किंगमुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडीने तोंड वर काढले. यामुळे ग्राहकांसह प्रवासीही वैतागले आहेत.

दर गुरुवारी येथे आठवडे बाजार भरतो. बाजारादिवशी तर निट्टूर रोड, नेसरी रोड व दुर्गामाता मंदिरासमोर व्यापारी चक्क रस्त्यावर दुकान मांडतात. विक्रेत्यांचा कलही याच बाजूला असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहतुकीची नेहमी येथे कोंडी होते. पार्किंगची सोय नसल्याने वाहनातून आलेला ग्राहक रस्त्यावर वाहने लावून बाजार करतो. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. बेशिस्त वाहतुकीचा व्यापारावरही परिणाम होत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवीन पुलापासून जुन्या बंधाऱ्यापर्यंत बाजारपेठेत खुली जागा असतानाही आठवडे बाजारातील विक्रेत्यांची दुर्गामाता मंदिर परिसरातच गर्दी होताना दिसते. बाजारपेठेत पट्टे मारले असले तरी आठवडे बाजाराचे कायमस्वरूपी नियोजन करण्याची गरज आहे. बाजारादिवशी लोकांच्या गर्दीतून उसाची वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक अधिकच धोकादायक ठरत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने वाहतूक कोंडी फोडून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बाजारपेठेच्या नियोजनाचा निर्णय घेतला. गुरुवारच्या आठवडे बाजारादिवशी बाजारपेठेत पांढरे पट्टे मारून दुकानदारांना व व्यापारी वर्गाला सूचना केल्या आहेत. व्यापाऱ्यांनी पट्टे मारून दिलेल्या पुढे दुकानांची मांडणी करू नये, असे आवाहन केले. 

उपक्रमाचे काटेकोर पालन हवे 
ग्रामपंचायत प्रशासनाच्या या विधायक उपक्रमाचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केल्यास बाजारपेठ विस्ताराला नक्की वाव मिळणार असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur