इचलकरंजीत १७ टक्के बनवेगिरी : वयाची चोरी करून पेन्शनची खाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वयाची चोरी करून पेन्शनची खाती

इचलकरंजीत १७ टक्के बनवेगिरी : वयाची चोरी करून पेन्शनची खाती

वयाची चोरी करून पेन्शनची खाती

इचलकरंजीत १७ टक्के बनवेगिरी; पोस्टात खात्याच्या निर्णयामुळे पर्दाफाश

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. २४ : पेन्शनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी मंजुरीची नवी खाती पोस्टात उघडली जात आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या पाच हजार ३०० लाभार्थ्यांच्या खाती काढण्याच्या प्रक्रियेत बनावट लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. थेट आधारकार्डवरील जन्मतारीख कमी करून वय वाढविण्याची बनावटगिरी उघडी पडली आहे. एकूण नोंदणीच्या तब्बल १७.२१ टक्के मंजूर लाभार्थी बनावट निघाले आहेत. यामुळे एजंटांना चांगलाच चाप बसणार आहे. दिसतोय तरुण आणि आधारकार्डवर वयोवृद्ध असे चित्र काहींचे खाते उघडताना दिसत आहे.

केंद्र व राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, अपंग निवृत्त योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी निवडून त्यांच्या बँक खात्यावर मंजूर रक्कम जमा केली जाते. शहरातील लाभार्थ्यांची संख्या आणि पेन्शन देण्यासाठी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या दोनच शाखा यामुळे अडचणी वाढत होत्या. कोरोनाच्या लॉकडाउननंतर नव्याने मंजुरीच्या प्रतीक्षेत असणारी सुमारे पाच हजार ३०० लाभार्थ्यांची खाती पोस्टात उघडण्याचा निर्णय अपर तहसीलसह संजय गांधी निराधार समितीने घेतला. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना पोस्टाद्वारे घरपोच पेन्शन मिळणार आहे. पोस्टात खाती उघडण्यासाठी काही दिवसांपासून वेदभवन येथे प्रक्रिया राबवली जात आहे. मंजूर लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन योजनेसाठी ६५ वर्षांची मर्यादा बंधनकारक आहे; मात्र खाती उघडताना मंजूर लाभार्थ्यांचे वय कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या नोंदणीत एजंटगिरीचा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले आहे.

सध्या एकूण लाभार्थ्यांच्या ४३.८४ टक्के लाभार्थ्यांची खाती उघडली आहेत. त्यापैकी तब्बल १७.२१ टक्के लाभार्थी बनावट निघाले आहेत. अनेकांनी आधारकार्डवरील जन्मतारखेत बदल करून तब्बल २० ते २५ वर्षांनी वय वाढवले आहे. याचा धसका आता उर्वरित लाभार्थ्यांनी घेतला असून आपोआपच वेदभवन येथे खाती काढण्यासाठी वर्दळ थंडावली आहे. पोस्टात खाती काढण्याच्या निर्णयामुळे बनावट लाभार्थ्यांवर नियंत्रण येताना दिसत आहे. तसेच या लाभार्थ्यांची बनावट नोंदणी करणाऱ्या एजंटांनाही चाप बसत आहे.

-----------

चौकट

एजंटांची नवी शक्कल

खाती काढताना बनावटगिरी समोर येत असल्याने एजंट नवा पर्याय शोधत आहेत. पहिल्यांदा बनावट आधारकार्डद्वारे पोस्टात खाती उघडत आहेत आणि नंतर मंजुरीच्या पत्रासाठी संजय गांधी निराधार समितीकडे जात आहेत. मात्र, प्रत्येक लाभार्थ्याला वेदभवन येथूनच मंजुरीचे पत्र मिळत असून त्या ठिकाणीच पोस्टात खाते उघडले जात आहे. त्यामुळे आधारकार्डवरील वय आणि प्रत्यक्ष डिजिटल प्रणालीवरील डाटानुसार वय याची पडताळणी होत आहे. याचा फटका बनावट लाभार्थ्यांना होत असल्याने एजंट नवा मार्ग शोधत आहेत.

--------

बनावट लाभार्थ्यांची शोधमोहीम

सध्या नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट लाभार्थी आढळून येत आहेत. त्यामुळे यापूर्वी मंजूर झालेल्या सुमारे २५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांची पडताळणी करणे गरजेचे बनले आहे. वेळीच प्रशासनाने प्रत्येक लाभार्थ्याची कागदपत्रे यासह त्यांचे वय याची पडताळणी करून शोधमोहीम राबवली पाहिजे.

-------

चौकट (आकडे बोलतात याप्रमाणे)

पोस्टात नव्याने निघणारी खाती

एकूण लाभार्थी - ५ हजार ३००

खाते काढलेले लाभार्थी- २ हजार ३२४

बनावट लाभार्थी- ४००

कोट

पोस्टातील खात्यामुळे बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. सध्या खाती उघडण्याचे काम सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांचे मंजुरीचे पत्र रद्द करण्यात येत आहे. यापुढे पात्र लाभार्थीच केवळ संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतील. बनावट लाभार्थी आणि एजंट यांच्यावर योग्य कारवाई केली जाणार आहे.

- शरद पाटील, अपर तहसीलदार, इचलकरंजी

loading image
go to top