esakal | Kolhapur : संगीतसूर्य पुरस्काराला निवड समितीचे ग्रहण
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : संगीतसूर्य पुरस्काराला निवड समितीचे ग्रहण

Kolhapur : संगीतसूर्य पुरस्काराला निवड समितीचे ग्रहण

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले म्हणजे येथील सांगीतिक पर्वातील सुवर्णपान. यंदाच्या त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने राज्य नाट्य स्पर्धेला त्यांचे नाव देण्याची घोषणा केली; पण स्थानिक पातळीवर त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा हवेतच विरली आहे. महापालिकेने या पुरस्कारासाठी पन्नास हजारांची तरतूद करून तब्बल तेरा वर्षे उलटूनही या पुरस्काराला मुहूर्त मिळालेला नाही आणि त्याला केवळ निवड समितीत महापालिकेचे अधिक की नाट्य परिषदेचे अधिक सदस्य, हा वादच कारणीभूत ठरला आहे.

केशवरावांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० चा, तर त्यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली ती ४ ऑक्टोबर १९२१ ला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच ते रंगमंचावर आले. ‘संगीत शारदा’मध्ये शारदेचे काम करणारा लहान मुलगा अचानक आजारी पडला आणि केशवरावांनी शारदेचे काम स्वीकारले. त्यांनी गायलेल्या पदाला तर तब्बल सात वेळा वन्समोअर मिळाला. या प्रयोगाला राजर्षी शाहू महाराजही उपस्थित होते. त्यांनी केशवरावांचे विशेष कौतुक केले. १९०८ मध्ये केशवरावांनी हुबळी येथे स्वतःची ‘ललितकलादर्श’ ही नाटक कंपनी सुरू केली.

नेपथ्याचे पडदे आनंदराव व बाबूराव पेंटर यांच्याकडून तयार करून घेतले आणि त्यातूनच मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. नाटक कंपनीसाठी त्यांनी स्पेशल रेल्वे घेतली. संपूर्ण भारतात स्वतःची रेल्वे असणारी ललितकलादर्श ही पहिलीच कंपनी ठरली. या कंपनीतून केशवरावांनी तब्बल ३१ नाटके आणि ५१ भूमिका अजरामर केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी येथे बांधलेल्या पॅलेस थिएटरचे उद्‌घाटन १४ ऑक्‍टोबर १९१५ ला ‘ललितकलादर्श’च्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकाने झाले. प्रयोगांमधून मिळालेला पैसा त्यांनी कोल्हापुरातच अंबाबाई मंदिराचे शिखर पाजळण्यात आणि लोकोपयोगी कामातच खर्च केला. ‘संयुक्त मानापमान’ नाटकाच्या रूपाने केशवराव व बालगंधर्व एकत्र आले.

टिळक स्वराज्य फंडाच्या निधीसाठी ७ जुलै १९२१ ला बालीबाला थिएटरमध्ये हा अनोखा प्रयोग झाला. त्याला पहिले तिकीट शंभर रुपयांचे आणि शेवटचे पाच रुपयांचे होते. अवघ्या अर्ध्या तासात सर्व तिकिटे संपली आणि त्यातून एकोणीस हजार रुपये जमा झाले. राजर्षी शाहू महाराजही ‘माझा केशा तळपती तलवार आहे...’ असे अभिमानाने सांगायचे आणि हा सारा देदीप्यमान इतिहास आहे. मात्र, नव्या पिढीसमोर तो पुन्हा पुन्हा येण्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांच्या या कार्याचा जागर व्हावा, अशी तमाम कलाकार, कलाप्रेमींची मागणी आहे.

"केशवरावांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्काराबरोबरच नाट्यगृह परिसरात पुतळा आणि इतर अनेक मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात तरी त्याबाबत सकारात्मक विचार व्हावा, हीच अपेक्षा आहे."

- अशोक पाटील, केशवराव यांचे पणतू

loading image
go to top