Bidri Factory Election Result : 'बिद्री'वर पुन्हा 'केपीं'चंच वर्चस्व! मुश्रीफ-बंटी पाटलांच्या साथीनं विरोधकांचा धुव्वा, सर्व 25 जागांवर विजय

‘बिद्री’त सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीविरोधात आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांनी परिवर्तनचे तगडे आव्हान उभे केले होते.
Bidri Factory Election Result
Bidri Factory Election Resultesakal
Summary

सत्ताधारी आघाडीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रावसो खिलारी (रा. बिद्री) या मेंढपाळाला निवडणुकीत उतरवले होते.

बिद्री : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व ढीगभर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Bidri Sugar Factory Election) काल (मंगळवार) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा सत्ता मिळवली.

विरोधी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), खासदार संजय मंडलिक, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा धुव्वा उडाला. सुमारे सात हजारांपेक्षा जास्त मताधिक्यांनी सत्ताधाऱ्यांनी (Mahalaxmi Shetkari Vikas Aghadi) हा गड जिंकला.

निकालानंतर मुस्कान लॉन येथील मतमोजणी केंद्रासह कारखाना कार्यक्षेत्रात विजयी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष करीत मुश्रीफ, सतेज पाटील आणि के. पी. यांचा जयघोष केला. निवडणुकीत अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह आठ विद्यमान संचालक विजयी झाले, तर पाच विद्यमान संचालकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तीन माजी संचालकांचे कारखान्यात पुनरागमन झाले.

Bidri Factory Election Result
कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे; शिकार, जनावरांचं मांस फाडण्यासाठी केला जात होता वापर

‘बिद्री’त सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या आघाडीविरोधात आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांनी परिवर्तनचे तगडे आव्हान उभे केले होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत परिवर्तनने प्रचारात जोरदार हवा निर्माण केली; परंतु त्यांना हा उत्साह मतदानात रूपांतरित करता आला नाही. विरोधी आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

‘बिद्री’साठी रविवारी (ता. ३) चुरशीने ८९ टक्के मतदान झाले होते. एकूण ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ४९० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी आठला १२० टेबलवर मतमोजणी सुरू झाली. काही केंद्रांवर सत्ताधारी गटाचे, तर काही केंद्रांवर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. परिवर्तन आघाडीच्या नेत्यांना राधानगरी तालुक्यातून ४००० ते ५००० मतांची आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु सत्तारूढ गटाने येथे लावलेल्या जोडण्या राधानगरी तालुक्यात यशस्वी झाल्याने परिवर्तनला अपेक्षित आघाडी मिळाली नाही. सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीने अपेक्षेप्रमाणे कागल तालुक्यात आघाडी घेतली.

पहिल्या फेरीत मोजलेल्या मतांमध्ये वाघापूर, मुधाळ, गंगापूर आदी गावांतही या आघाडीचे विमान आघाडीवर राहिले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विजयाच्या दिशेने कूच केली. पहिल्या फेरीत राधानगरीतील ५१, कागलमधील ४८, तर भुदरगडमधील २१ गावांतील ३५ हजार ४८९ मतदान मोजण्यात आले. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार एक हजार ते पंधराशे मतांनी आघाडीवर होते. फेरी दोनमध्ये भुदरगडमधील ४२ आणि करवीरमधील ११ गावांतील १४ हजार ४५१ मते मोजली गेली. यातही सत्ताधारीच आघाडीवर होते.

हीच आघाडी कायम ठेवत सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ‘बिद्री’ आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. निवडणुकीसाठी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना सहायक निबंधक सुनील धायगुडे, प्रदीप मालगावे, बाळासाहेब पाटील, नारायण परजणे, गजेंद्र देशमुख, प्रेम राठोड, कृष्णा ठाकूर, नितीन माने यांनी साहाय्य केले.

यांनी केले नेतृत्‍व

सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केले. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे नेतृत्व खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजित घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील यांनी केले.

Bidri Factory Election Result
Hasan Mushrif : भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यासोबत झाली होती; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

निवडणुकीत पडलो ओ...

मतदान केंद्रावर निकाल जाहीर झाल्यानंतर एका पराभूत उमेदवाराने आपल्या खिशाला लावलेला उमेदवार बॅच काढून खिशात ठेवला. याच वेळी एका पोलिसांनी तुम्ही कोण आहात, अशी विचारणा केली. यावर त्या ‘भाऊंनी’ मी उमेदवार असल्याचे सांगितले; पण मी पडलो ओ..(पराभूत झालो) म्हणून उमेदवार म्हणून असणारा बॅच खिशात ठेवल्याचे प्रांजळपणे सांगितले. यावर त्या पोलिसाला हसण्याशिवाय दुसरा पर्यायच दिसला नाही.

विरोधकांचा काढता पाय

निकालाचा कल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाताना दिसताच मतमोजणी ठिकाणावरून विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी हळूहळू काढता पाय घेतला. विजयाची खात्री होताच आघाडीचे प्रमुख के. पी. पाटील व अन्य उमेदवार दुपारी दोनच्या सुमारास केंद्रावर आले. उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला.

स्वाभिमानीने घेतली लक्षवेधी मते

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पोवार गट क्रमांक दोन राधानगरीमधून, तर बाळासाहेब पाटील गट क्रमांक तीन कागलमधून रिंगणात होते. पहिल्या फेरीत अजित पोवार यांनी १९६६, तर बाळासाहेब पाटील यांनी १६१८ मते घेतली. दुसऱ्या फेरीतही त्यांनी चांगली मते घेतली.

धनगर समाजाला प्रतिनिधित्वाची प्रथमच संधी

सत्ताधारी आघाडीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रावसो खिलारी (रा. बिद्री) या मेंढपाळाला निवडणुकीत उतरवले होते. पिवळा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर पांढरा फेटा, खांद्यावर घोंगडे अशा साध्या वेशातील खिलारी मामांनी सर्वच प्रचारसभांत मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. आता कारखान्यात पहिल्यांदाच धनगर समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

Bidri Factory Election Result
'भोगावती'च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे शिवाजीराव पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कवडेंची बिनविरोध निवड

सत्यजित जाधवांना सर्वाधिक मते

सत्तारूढ आघाडीचे गट क्रमांक सहा भुदरगडमधील उमेदवार सत्यजित जाधव यांना सर्वाधिक २९ हजार १०१ मते मिळाली. के. पी. पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची २८ हजार ६९३ मते मिळाली. सत्तारूढ गटात सर्वात कमी मते कागल गटातील रणजित मुडकशिवाले यांना (२५ हजार ९९९ मते) मिळाली. सत्तारूढ गटाचे उमेदवार कमीत कमी चार हजार ते जास्तीत सात हजार ४०१ मतांनी विजयी झाले. विरोधी आघाडीत सर्वाधिक २२ हजार ७४८ मते जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांना पडली. विद्यमान संचालक ए. वाय. यांना २१ हजार ७०० मते पडली.

या यशाचे मानकरी ऊस उत्पादक शेतकरी आहेत. कारखान्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि विरोधकांनी वारेमाप केलेले पैशांचे वाटप यांमुळे सभासद चिडून होते. यापुढे बिद्रीच्या प्रगतीत भर घालून कारखाना देशात ‘लय भारी’ करू. विजयात पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, शिवसेना व मित्रपक्ष या सर्वांचा मोठा वाटा आहे.

- के. पी. पाटील, अध्यक्ष बिद्री कारखाना

लोकशाही प्रक्रियेत हार-जित होत असते. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्या पॅनेलचा पराभव झाला. भविष्यात कारखान्याच्या हितासाठी आमचे नेहमी सहकार्य राहील. विजयी झालेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.

-प्रकाश आबिटकर, आमदार

प्रमुख विजयी

विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील, संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, गणपतराव फराकटे, प्रवीणसिंह पाटील, मधुअप्पा देसाई, धनाजी देसाई, के. ना. पाटील. तेरा नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.

प्रमुख पराभूत

विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक ए. वाय. पाटील, एकनाथ पाटील, युवराज वारके, बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक रणजितसिंह पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू व जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, के. जी. नांदेकर.

मतमोजणीचे नेटके नियोजन

मतदानापासून निकालापर्यंत नेटके नियोजन केल्याने कुठेही गोंधळ नव्हता. सांगली, सातारा जिल्ह्यांतून सहकार विभागाचे अधिकारी नियुक्त होते. १२० केंद्रांवरील मतमोजणीसाठी तेवढेच टेबल ठेवल्याने तब्बल साडेपाच लाख मतपत्रिका हाताळून निकालही लवकर जाहीर करण्यात यंत्रणेला यश आले. अलीकडे जास्त मतदान असूनही वेळेत निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Bidri Factory Election Result
कुणबी समाजाचे आरक्षण न घेता मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण घेणे गरजेचे; आनंदराज आंबेडकरांचा महत्त्वाचा सल्ला

बॅरिकेडस्‌ तोडून कार्यकर्ते मतमोजणी केंद्रात

माजी आमदार के. पी. पाटील मतदान केंद्रावर आल्यानंतर काही उत्साही कार्यकर्ते बॅरिकेडस् तोडून मतमोजणी केंद्रात आले. निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांनी उमेदवारांना सूचना देत कार्यकर्त्यांना आवर घालून बाहेर नेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांसह उमेदवारांनी कार्यकर्त्यांना बाहेर नेले.

यांचे पुनरागमन

माजी संचालक डी. एस. पाटील, सुनील सूर्यवंशी, पंडित केणे.

सासरे-जावई पराभूत

अध्यक्ष के. पी. पाटील विजयी झाले, तर त्यांचे दाजी व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पराभूत झाले. सरवडेच्या राजेंद्र पाटील यांनी त्यांचे मामा विठ्ठलराव खोराटे यांचा पराभव केला. मुरगूडचे प्रवीणसिंह व रणजितसिंह सख्खे भाऊ परस्परविरोधी पॅनेलमधून निवडणूक लढवत होते. त्यात प्रवीणसिंह यांनी बाजी मारली. अध्यक्ष के. पी. पाटील यांचे भाचे सुनील सूर्यवंशी आणि व्याही गणपतराव फराकटे सत्ताधारी पॅनेलमधून विजयी झाले. माजी संचालक के. जी. नांदेकर आणि जयवंत पाटील हे सासरे व जावई दोघेही पराभूत झाले.

Bidri Factory Election Result
'शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही महायुतीत सहभागी झालो, तर आमचं काय चुकलं?'

आजचं ते बी मलाच नि उद्याचं बी मलाच....

के. पी. व ए. वाय. यांच्यात प्रचारात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. विरोधी आघाडीच्या तुरंबे येथील प्रचार प्रारंभावेळी ए. वाय. पाटील यांनी के. पी. यांच्यावर टीका करताना ‘आजचं ते बी मलाच आणि उद्याचं बी मलाच’, अशी टीका केली होती. आज निकालानंतर के. पी. यांच्या समर्थकांनी त्याचे स्टेटस लावत आगामी विधानसभा निवडणुकीत के. पी.च बाजी मारणार असल्याचे सुचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com