कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhpaur

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

कोल्हापूर - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी निश्‍चित

कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्वैवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून छाननी प्रकियेनंतर निवडणूक अधिकारी सागर नागरे यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. अध्यक्षपदासाठी राज्यातून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे गांधी यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली.

गांधी गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्य केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिलच्या ९२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गांधी यांच्या नेतृत्वाखालील दोन उपाध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिलवरील २७ सदस्य बिनविरोध झाले असून, व्यवस्थापन समितीच्या उर्वरित तीन जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात आहेत. गव्हर्निंग कौन्सिलच्या उर्वरित ६२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ नोव्हेंबर अर्ज माघारीची शेवटची तारीख असून, त्यानंतर उर्वरित जागांवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: "हाच का 'महाविकास आघाडी'चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?"

उद्योजकांना प्रोत्साहन

उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील लोकांना उद्योग व व्यापारात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १९२७ ला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरची स्थापना केली. राज्यातील ५५० हून अधिक व्यापारी, औद्योगिक संघटना तसेच चार हजारांहून अधिक व्यापारी, उद्योजक चेंबरशी संलग्न आहे. ५५० संलग्न सभासदांच्या माध्यमातून चेंबर राज्यातील ७ लाख व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करत आहे.

"शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही दुर्मिळ घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषिपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहीन. महाराष्ट्राला देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाबरोबर कार्य करून यश मिळवेन."

- ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

हेही वाचा: 'हॉंगकॉंगमध्ये झोपा काढायला बसेस अन् महाराष्ट्रात...'

loading image
go to top