
शुक्रवारी कोल्हापुरात जयमहाराष्ट्र लिहून काळे फासल्यावर व औरंगाबाद येथे कर्नाटक परिवहनच्या बसेस रोखल्यानंतर खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील बसेस निपाणी आगारात आल्या नव्हत्या.
Border Dispute : निपाणीतून आंतरराज्य बससेवा सुरळीत; प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद
निपाणी - सीमाप्रश्नाच्या दाव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलेले वक्तव्य व त्याला महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळालेले प्रत्युत्तर याचा परिणाम दोन्ही राज्यादरम्यान होणाऱ्या बस वाहतुकीवर दोन दिवस दिसून आला. शुक्रवारी (ता. २५) आंतरराज्य वाहतूक बंद होती. शनिवारी (ता. २६) ही सेवा सुरळीत झाली असली तरी प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बसस्थानक परिसर सुनासुना दिसत होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
शुक्रवारी कोल्हापुरात जयमहाराष्ट्र लिहून काळे फासल्यावर व औरंगाबाद येथे कर्नाटक परिवहनच्या बसेस रोखल्यानंतर खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील बसेस निपाणी आगारात आल्या नव्हत्या. कोल्हापुरातून गडहिंग्लज, आजरा या मार्गावर जाणाऱ्या बसेस कापशीमार्गे वळवण्यात आल्या होत्या. अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. निपाणी आगाराच्या कोल्हापूर मार्गावर होणाऱ्या बसफेऱ्याही थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर निपाणीतून होणारी आंतरराज्य वाहतूक कमी-जास्त प्रमाणात सुरू झाली. मात्र दुपारनंतर पुन्हा वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसूर आणि बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांनी बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी (ता. २६) देखील दिवसभर राज्य राखीव पोलिसांची तुकडी आणि पोलिस वाहने बसस्थानक परिसरात तैनात करण्यात आली होती. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत किरकोळ प्रमाणात बससेवा सुरू होती. पण बस सुरू झाल्याचे प्रवाशांना माहीत नसल्याने दुपारनंतर कर्नाटक महाराष्ट्रातील सर्वच मार्गावर दोन्ही राज्यांच्या बस धावत असताना प्रवासी मात्र किरकोळ प्रमाणात दिसत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने रविवारपासूनच आंतरराज्य सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
दोन्ही परिवहन महामंडळांना फटका
शुक्रवारी दिवसभर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वच आगाराच्या आंतरराज्य बस सेवा बंद होत्या. मात्र स्थानिक पातळीवर बस सुरू असल्याने किरकोळ प्रमाणात उत्पन्न मिळाले. मात्र अंतराळ सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने दोन्ही परिवहन महामंडळांना आर्थिक फटका बसला.