खासदार मंडलिकांच्या कार्यकर्त्यांचं ठरलं मुख्यमंत्री शिंदे गटासोबत जायचं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra politics MP Sanjay Mandalik join cm eknath shinde group kolhapur

खासदार मंडलिकांच्या कार्यकर्त्यांचं ठरलं मुख्यमंत्री शिंदे गटासोबत जायचं

म्हाकवे : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करुन कार्यकर्त्यांना सन्मान आणि बळ देण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे. अशी आग्रही भूमिका प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगतातून मांडली आणि सत्तेसोबत जाण्यासाठी खासदार मंडलिक यांना साकडे घातले. कार्यकर्त्यांनी आज स्पष्ट भावना व्यक्त केल्या. खासदार मंडलिक जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी एकजूटीने एकनिष्ठ राहण्याचा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे हात उंचावून घेतला.

हमिदवाडा कारखाना येथे झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. मेळाव्यास कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले-पाटील, संचालक रामचंद्र सांगले, शिवाजी इंगळे, दिनकर पाटील, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, केशव पाटील, बाजीराव गोधडे, आनंदा फराकटे, शेखर सावंत, नंदू पाटील, आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंडलिक गटाचा व्यापक मेळावा मंडलिक कारखाना कार्यस्थळावर झाला. मेळाव्यात उपस्थित प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी प्रखड भावना व्यक्त करतांना सत्तेसोबत राहिलो तरच विकासकामे करता येतील असा एकमुखी सुर लावला. मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले "मुरगुड नगरपालिकेत एकनाथ शिंदे यांनी निधी दिला म्हणून विकास कामे झाली. एकनाथ शिंदे हे मास लीडर आहेत. भविष्याच्या विकासाची गंगा आणायची असेल शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत जाणे गरजेचे आहे."

सत्यजित पाटील म्हणाले," महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचाच वरचष्मा होता. त्यामुळेच शिवसेनेचे आमदार नाराज झाले. राजकारणात पुढे जायचं असेल, तालुक्याची विकास कामे करायची असतील, तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या गटात जाणेच योग्य आहे." सुधीर पाटोळे म्हणाले "भावनिकतेवर गट आणि संघटना चालत नाही. आपल्याला गट व संघटना टिकवायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पाहिजे. तरच गावागावात विकासकामे करता येतील. शिंदे गटातसोबत राहण्यातच आपल्या गटाचे हित दिसते."

स्वागत व प्रास्ताविक राजेखान जमादार यांनी केले. जयवंत पाटील (कुरुकली), भगवान पाटील (बानगे), अनिल शिंदे (कुरणी), आनंदा फराकटे (फराकटेवाडी), एन.एस. चौगुले (सोनाळी), नामदेव मेंडके (मुरगुड), आर. डी.पाटील (कुरुकली), अतुल जोशी (कागल) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे हात उंचावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी रहावे असा निर्णय घेतला. मात्र अंतिम निर्णय खासदार संजय मंडलिक यांनीच घ्यावा. असा ठराव बैठकीत करण्यात आला.

आता खासदार मंडलिक निर्णय घेतील.

ॲड. वीरेंद्र मंडलिक म्हणाले," खासदार संजय मंडलिक यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयावरच ते आपला निर्णय घेणार आहेत. कार्यकर्त्यांचा ओघ असेल, त्या सोबतच आपल्याला जावं लागेल. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना जशा आहेत तशा खासदार मंडलिकांना कळविल्या जातील. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करतील."

कागल तालुक्यातील गावागावात विकास झाला असेल, मग तो निकृष्ट दर्जाचा का असेना. निधी मिळत नसेल तर तुम्ही सभागृहात मांडले पाहिजे. मात्र ज्या पक्षातून तुम्ही निवडून आला आहात त्याच पक्षात एकनिष्ठ राहावं. तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नका. उद्धव ठाकरे सोबत राहिलात तरच तुमची प्रतिष्ठा राहील. तुमचे जनमत टिकेल अशी प्रखड भावना हणबरवाडीचे दत्ता कसलकर यांनी व्यक्त करत खासदार संजय मंडलिक जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. असेही सांगितले.

Web Title: Maharashtra Politics Mp Sanjay Mandalik Join Cm Eknath Shinde Group Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top