
बॉक्स देवगड हापूसचा, आंबा मात्र दुसराच
कोल्हापूर: शालेय सुटीचा हंगाम सुरू झाला आहे, पर्यटन जोरात सुरू आहे. घरोघरी पाहुणेमंडळी सुटीला आली आहेत. खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची हौस वाढत आहे. त्याचा गोडवा वाढवण्यासाठी हापूस आंब्याचा मनसोक्त आनंद घेतला जात आहे त्यामुळे फळबाजारात हापूसची मागणी वाढत आहे. त्याच लाभ उठवत काही फळ विक्रेत्यांनी देवगड हापूसच्या बॉक्समध्ये दुसरेच आंबे घालत कमाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक व प्रामाणिक विक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसत आहे.
देवगड, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी जिल्ह्यांतून अस्सल कोकणी हापूस आंबा कोल्हापूरच्या घाऊक बाजारपेठेत येतो. पेटीचे भाव दीड ते दोन हजार रुपयांच्या घरात आहेत. कधी मागणीनुसार दर कमीही केले जातात. कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे मागणी वाढत असते. अशात जादा नफा कमावण्यासाठी काही व्यापारी देवगड हापूस अशी ठळक अक्षरे छापलेल्या बॉक्समध्ये कारवार, धारवाड, मद्रासकडून येणारा आंबा मिक्स करत असल्याचे चित्र आहे.
कोकणी हापूस मध्यम आकाराचा व जास्त गोडवा असलेला आहे. दाक्षिणात्य हापूस हा कोकणी हापूसच्या तुलनेत दिसायला मोठा व आर्कषक आहे. गोडवा तुलनेने कमी आहे. त्याचे भावही एका पेटीला ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान आहेत. असा कमी किमतीचा आंबा देवगड हापूसच्या बॉक्समध्ये घालून तोच देवगड हापूस या नावाने विकला जातो. देवगड हापूस म्हणजे सर्वाधिक भाव म्हणत पैसे जास्त घेतले जातात. काही वेळा बारगेनिंग करून पैसे कमी करूनही बॉक्स विकला जातो. यात ग्राहकांची फसगत होते.
या उलट देवगडमधून आलेला किंवा अस्सल कोकणी हापूस आंबा अनेक प्रामाणिक विक्रेत्यांकडे आहे. त्याचे भावही बॉक्सला ५०० रुपयांच्या पुढे आहेत. येथे बारगेनिंगमध्ये भाव कमी केले जात नाहीत म्हणून अनेक ग्राहक माघारी फिरतात. ज्या बॉक्समध्ये मिक्स केलेला आंबा आहे तो खरेदी करून फसगत करून घेतात. यात प्रामाणिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडत आहे. फळ बाजारातील आंब्यांचा दर्जा, गुणवत्ता, तपासणी, भाव नियंत्रण याबाबत कोणतीही अधिकृत यंत्रणा येथे नाही. त्यामुळे या फसवणुकीला आळा घालावा कोणी, असा प्रश्न कायम आहे.
आंबा मिक्सिंग उघडपणे कोणी करीत नाही, छुप्या प्रमाणात असे प्रकार घडू शकतात. चिकित्सक ग्राहक मात्र अस्सल हापूस आंबा जो दर असेल तो देऊन खरेदी करतो. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याकडून अशी फसगत होत नाही. काही मोजक्या घटकांकडून फसगत होत असेल तर ग्राहकांनीही दक्षता घेणे आवश्यक आहे.
- शौकत बागवान, फळ विक्रेता
Web Title: Mango Devgad Hapus Different
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..