esakal | Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; मौनी सागर जलाशय 100 टक्के भरला
sakal

बोलून बातमी शोधा

मौनी सागर

पावसाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दडी मारली. मात्र चार दिवसांत पावसाने पुन्हा दमदार पुनर्आगमन केले.

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; मौनी सागर जलाशय 100 टक्के भरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे काळम्मावाडी धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाच्या पाच दरवाजांतून ५९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. शहरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे.

पावसाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दडी मारली. मात्र चार दिवसांत पावसाने पुन्हा दमदार पुनर्आगमन केले. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम होता. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडला. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे.

परिणामी काळम्मावाडी धरण ९९ टक्के भरले असून याचे दोन वक्राकार दरवाजे ५० सेमीने तर तीन २५ सेमीने उचलले आहेत. यातून ५००० व वीज गृहातून ९०० क्युसेक्स असे ५९०० क्युसेक पाणी प्रवाहित झाले आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातही पूर्ण पाणीसाठा झाला आहे. काढणीस आलेला भुईमूग, सोयाबीन पिकांसाठी हा पाऊस मारक ठरणार आहे. मात्र पोट्रीत आलेल्या भातासाठी पाऊस पोषक आहे. नदीच्या पातळीत जरी वाढ झाली असली तरी सध्या पुराचा धोका उद्‍भवत नाही. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मौनी सागर जलाशय १०० टक्के भरला

कडगाव : पाटगाव (ता. भुदरगड) येथील मौनी सागर जलाशय पूर्ण भरला. प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. तालुक्याच्या पश्चिम भागात चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढत आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गतवर्षी पाटगाव प्रकल्प १६ ऑगस्टला भरला होता. यावर्षी २२ जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्डब्रेक ४३६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यावेळी धरणांत ८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. प्रशासनाने खबरदारी घेऊन धरणातून विसर्ग चालु ठेवल्याने धरण भरण्यास उशीर लागत होता. सध्या धरणात सुमारे ३.७५ टीएम.सी पाणी साठा झाला आहे. आजअखेर धरण क्षत्रात ५७०० मिमी पावसाची नोंद झाली. प्रकल्प पूर्ण संचय पातळी - ६२६.६० मीटर झाली.आजचा एकूण पाणीसाठा १०५ द.ल.घ. आहे. गतवर्षाच्या तुलनेत सुमारे २०० मिमी जास्त पावसाची नोंद झाली. चोवीस तासात पाटगाव परिसरात १५० मि.मि. पावसाची नोंद झाली.

loading image
go to top