esakal | भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू

ओढ्याचे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण; तलाव रात्री फुटल्याने नुकसानीचा नेमका अंदाज बांधता येत नाही.

भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कडगाव (कोल्हापूर) : भुदरगड (Bhudargad) तालुक्यातील मेघोली लघु तलाव (Megholi Lake) फुटला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता, की ओढ्याच्या दोन्ही बाजूंची सर्व पिके वाहून गेली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ आदी गावांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते (वय ५५) वाहून गेल्याचे सांगण्यात आले. पती, मुलगा व नातू गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले; परंतु पती, मुलगा व नातू एका झाडाला धरून बसले आणि कसेबसे बाहेर पडले; परंतु आपली आई वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले. त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने नुकसान झाले. मोहिते कुटुंबासह कसेबसे बाहेर पडले; परंतु त्यांचा एक बैल, तीन म्हशी अशी चार जनावरे गोठ्यातच मृत्युमुखी पडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे कोसळली. मोटारसायकलीही वाहून गेल्या. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांत मेघोली प्रकल्प फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

हेही वाचा: शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी मिठागरे अडचणीत

रात्रीच्या झोपेत असणारे अनेक नागरिक ओढ्याच्या दिशेने धावले. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तलाव रात्रीच फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तब्बल दोन किलोमीटरपर्यंत येत होता. ओढ्याचे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. तलाव रात्री फुटल्याने नुकसानीचा नेमका अंदाज बांधता येत नव्हता; परंतु या घटनेमुळे शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे, हे मात्र नक्की.

loading image
go to top