esakal | वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागावर मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Morcha On Forest Department For Wildlife Conservation Kolhapur Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथील वन विभागावर मोर्चा काढण्यात आला. हत्ती, गवे व अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली.

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागावर मोर्चा

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येथील वन विभागावर मोर्चा काढण्यात आला. हत्ती, गवे व अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शंखध्वनी आंदोलन केले. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तातडीने हालचाली न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशाराही आंदोलकांनी या वेळी दिला. 

जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हाध्यक्ष प्रताप पाटील व आजरा तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी आघाडी सरकार व वनअधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागेश चौगुले म्हणाले, ""वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन व विनंती करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहे. शेतकऱ्यांसाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ देत, आम्ही तयार आहोत.''

या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी मध्यस्थी केली. हत्तीच्या बंदोबस्तासाठी केरळहून पथक आणले जाणार होते. त्याचे काय झाले, याची विचारणा उपतालुकाध्यक्ष आनंदा घंटे यांनी केली. चौगुले, प्रताप पाटील व घंटे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. आजऱ्याचे प्रभारी वनक्षेत्रपाल डी. बी. काटकर यांनी हत्ती, गवे व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने बैठक लावून प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

दरम्यान, वनअधिकारी काटकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वन्यप्राण्यांकडून झालेली पिकांची नुकसान भरपाई तुटपुंजी मिळते. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. स्थानिकांना विश्‍वासात घेऊन हत्ती संगोपन केंद्र करावे. या वेळी आजरा उपशहराध्यक्ष इक्‍बाल हिंग्लजकर, चंद्रकांत सांबरेकर, संतोष चौगुले, वसंत घाटगे, प्रवीण बेळगावकर, सुरेश मगदूम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
 

संपादन - सचिन चराटी

loading image