esakal | निम्म्याहून अधिक मूर्ती शेडमध्येच 
sakal

बोलून बातमी शोधा

More than half the idols are in the shed

गेल्या वर्षीच्या महापुराच्या फटक्‍यानंतर यंदाचा गणेशोत्सवही मूर्तीकारांना आर्थिक संकटात आणणारा ठरला आहे. निम्म्याहून अधिक तयार मूर्ती यंदा शेडमध्येच शिल्लक राहिल्या आहेत

निम्म्याहून अधिक मूर्ती शेडमध्येच 

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर :  गेल्या वर्षीच्या महापुराच्या फटक्‍यानंतर यंदाचा गणेशोत्सवही मूर्तीकारांना आर्थिक संकटात आणणारा ठरला आहे. निम्म्याहून अधिक तयार मूर्ती यंदा शेडमध्येच शिल्लक राहिल्या आहेत. प्रत्येक मूर्तीकाराचे सरासरी दीड लाखांपासून ते पंधरा लाखांपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महापुराच्या पाण्यात मूर्ती राहिल्याने तर यंदा चार फुटाच्या मूर्तीचा निर्णय ऐन उत्सवाच्या तोंडावर झाल्याने मूर्तीकारांना या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तयार मूर्ती कुठे ठेवायच्या आणि आणि त्याशिवाय उत्सवासाठी घेतलेल्या हंगामी कर्जाची परतफेड कशी करायची?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असून या व्यवसायाला कोणत्याही प्रकारच्या विम्याचे संरक्षण नाही. दरम्यान, मंडळांच्या मोठ्या शिल्लक मूर्तींचे प्रमाण सरासरी 50 ते 60 टक्के आहे. यंदा घरगुती मूर्तीही 25 ते 30 टक्के शिल्लक आहेत. 
मुळात कोल्हापूरचा विचार केला तर गणेशोत्सवानंतर महिनाभर विश्रांती घेवून मूर्तीकार लगेचच दसऱ्याच्या मुहूर्तावर पुढील वर्षीच्या मूर्तीकामाला प्रारंभ करतात. त्यानंतर साधारपणे दिवाळीनंतर शहरातील काही बॅंका या व्यवसायासाठी हंगामी कर्जे देतात आणि गणेश चतुर्थीनंतर मूर्तीकार या कर्जाची परतफेड करतात. मात्र, सलग दोन वर्षे हे आर्थिक चक्र बिघडल्याचे स्पष्ट चित्र सध्या कुंभार समाजात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा चार फुटापर्यंतच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, अगोदरच अकरा फुटापर्यंतच्या मूर्ती तयार झाल्या होत्या. त्यामुळे कुंभार समाजाने किमान यंदाच्या वर्षी हा नियम नको, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी त्याबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका शासनाने घेतली नाही. ऐन उत्सवाच्या तोंडावरच पुन्हा हा नियम सर्वत्र बंधनकारक केल्याने केवळ शहर आणि जिल्हाच नव्हे तर बाहेरगावी जाणाऱ्या मूर्ती नेण्यासाठीही कुणी फिरकले नसल्याचे मूर्तीकार सांगतात. 

सरासरी नुकसान असे... 
* शहरातील मुर्तीकारांची संख्या....300 
* सरासरी शिल्लक मुर्तींचे प्रमाण....50 ते 60 टक्के 
* सरासरी आर्थिक नुकसान....5 ते 6 लाख 
* सरासरी आर्थिक फटका...15 ते 18 कोटी 

""यंदा सत्तर ते ऐंशी टक्के तयार मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्‍न आहे आणि आर्थिक नुकसानही मोठे आहे. 
- सुरेश माजगावकर, बापट कॅम्प 

शाहूपुरी परिसरातील मूर्तीकारांना गेल्या वर्षी महापुराचा मोठा फटका बसला. यंदा लॉकडाऊनमुळे बाहेरगावीही मूर्ती पाठवता आल्या नाहीत. 
- उदय कुंभार, शाहूपुरी 

यंदा शहरातील अनेक मूर्तीकारांकडे केवळ मोठ्या मंडळांच्याच नव्हे तर घरगुती मुर्तीही पंचवीस ते तीस टक्के इतक्‍या शिल्लक राहिल्या आहेत. 
- सर्जेराव निगवेकर, गंगावेश

loading image
go to top