आता ठरलं... खंडपीठासाठी ‘आर-पार’ची लढाई...

Movement for construct circuit bench of Mumbai High Court in Kolhapur
Movement for construct circuit bench of Mumbai High Court in Kolhapur
Updated on

कोल्हापूर - ज्यांच्याकडे केवळ मोटार आहे, त्यांच्यासाठीचा टोलचा लढा यशस्वी केला. आता तर पायात चप्पल नसलेल्यांपासून ते सुटाबुटात असलेल्यांपर्यंतचा हा लढा आहे. त्यामुळेच खंडपीठासाठी ‘आर-पार’ ची लढाई लढूया ! हा प्रश्‍न सुटल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. 
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी सुरू असलेल्या खंडपीठ आंदोलनाचे मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कसबाबावडा येथील न्यायसंकुलासमोर धरणे आंदोलन झाले. जिल्ह्यातील सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी ‘खंडपीठ आमच्या हक्काचे’ अशा घोषणा दिल्या गेल्या. 

एकजुटीने लढा सुरू ठेवायचा

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी गेली ३४ वर्षे लढा सुरू आहे. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मला आमदार, माजी मंत्री म्हणून जे काय करता येईल ते मी करेन. मला आमदार कोल्हापूरकरांनी केले. त्याची परतफेड मला करायी आहे. माझी कर्मभूमी कोल्हापूर आहे. जनतेने मला जितके प्रेम दिले तितके लोकांसाठी देत आहे. हा लढा कित्येक वर्षे सुरू आहे. यातून काही निष्पन्न होत नसेल तर हा लढा का लढायचा, अशी टीका होत आहे. खंडपीठ (सर्किट बेंच) मिळत नाही; तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. एकजुटीने लढा सुरू ठेवायचा आहे. कोल्हापुरातील टोलच्या लढ्याची आठवण करून द्यायची आहे.’’

अजित पवार यांच्याशी माझे बोलणे झाले

ते म्हणाले, ‘‘माझ्या आयुष्यात आता दोनच महत्वाची कामे राहिली आहेत. ती म्हणजे वीस लाख मराठी लोक कर्नाटकात आजही लढा देत आहेत, त्यांना महाराष्ट्रात आणायचे आहे. सीमा प्रश्‍न सोडवायचा आहे आणि दुसरे म्हणजे खंडपीठ कोल्हापुरात झाले पाहिजे. हा प्रश्‍न सुटत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असा मी निर्धार  केला आहे. सर्वांनी एकजुटीने आंदोलन करायचे आहे. टोलसारखे आंदोलन करून हा विषय निकाली लावू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. लवकरच ते मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतील. तेंव्हा मी स्वतः शिष्टमंडळात असणार आहे.’’

आठ फेब्रुवारीला लोकन्यायालयावर बहिष्कार

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग २४ फेबुवारीला निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी सर्किट बेंचचा प्रश्‍न निकाली निघावा म्हणून आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. येत्या आठ फेब्रुवारीला लोकन्यायालयावर बहिष्कार घालण्यात येईल. टप्प्याटप्प्याने आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.’’
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे म्हणाले, ‘‘सरकार पूर्णपणे ‘पॉझिटीव्ह’ असतानाही न्यायसंस्थेकडून दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट केले. न्यायसंस्थेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे; मात्र येथे असे होताना दिसत नाही. पक्षकार केंद्र बिंदू मानून न्यायसंस्था चालली पाहिजे; मात्र सध्या न्यायसंस्था केंद्रबिंदू मानून काम चालले आहे. मुंबईतील कामे कमी होण्याची भिती आहे. त्यामुळेच वीस-पंचवीस वर्षे न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्यांकडे दुर्लक्ष होत आहे.’’  

माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, किशोर घाटगे, दिलीप पवार, अशोक पोवार, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष डी. बी. भोसले, सुभाष देसाई आदींनी मनोगत व्यक केले. यावेळी उपाध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी अध्यक्ष ॲड. सर्वश्री शिवाजीराव राणे, अजित मोहिते, धनंजय पठाडे, डी. डी. घाटगे, के. ए. कापसे, बाळासाहेब पाटील, प्रशांत चिटणीस, पंडितराव सडोलीकर, सचिव गुरुप्रसाद माळकर, सुभाष पिसाळ, वैभव काळे, शिल्पा सुतार, सपना हराळे, रेश्‍मा भुर्के आदीं पदाधिकाऱ्यांसह वकिलांचा सहभाग होता. नागरी कृती समितीचे रमेश पवार, गणी आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जयकुमार शिंदे आदींसह माजी महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर, प्रतिमा सतेज पाटील, गांधीनगर सरपंच रितू लालवाणी, वसंतराव मुळीक, ॲड. विजय गाडेकर (सांगली), अतुल दिघे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

आंदोलनाचे नेतृत्व एन. डी. यांच्याकडेच

खंडपीठ आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्याकडे देण्याचे आज सर्व वकिलांनी एकमताने ठरविले. कोल्हापुरातील टोलविरोधातील मोठे जनआंदोलन श्री. एन. डी. यांच्या नेतृत्वाखालीच उभे राहिले होते. या आंदोलनामुळे टोल हटला होता. त्यामुळेच वकिलांनी खंडपीठ आंदोलनाचे नेतृत्व डॉ. पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे आज आंदोलनादरम्यान स्पष्ट करण्यात आले.

नूतन महापौरांपासून आंदोलन सुरू

खंडपीठ नागरी कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी आता कोणीही सांगितले तरीही लढा थांबवायचा नाही, असे स्पष्ट केले. दहा फेब्रुवारीला महापौर निवड आहे. निवड झाल्यानंतर महापौरांची पहिली बैठक खंडपीठाच्या आंदोलनासाठी घेतली जाईल. कारण नागरी कृती समितीचे अध्यक्ष महापौर आहेत. तेथून लोकलढा सुरू करू, वकिलांना न्यायालयात जाण्यापासून रोखून धरून आंदोलन करू, असेही पोवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com