कुंकवासाठी शेतीला दिवसा वीज द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL Give electricity to the farm Widow demand Mahila Aghadi

कुंकवासाठी शेतीला दिवसा वीज द्या

कोल्हापूर: महावितरण शेतीला रात्री वीज देत असल्याने शेतकऱ्यांचा विजेचा धक्का बसून, गवा, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन माता, भगिनी विधवा होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र व कुंकवाच्या रक्षणासाठी सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने केली.

येथील महावितरण कार्यालयासमोर ७ दिवसांपासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसूत्र, कुंकू व बांगड्या देऊन यांचे रक्षण करा, अशा भावना व्यक्त केल्या. पद्माराणी पाटील म्हणाल्या, ‘‘शेतास रात्री-अपरात्री पाणी पाजण्यासाठी जावे लागत आहे. राज्यात दैनंदिन एखाद्या शेतकऱ्याचा विजेच्या शॉकने अथवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव जात आहे. यामुळे शासनाने तातडीने याबाबत शेतीस दिवसा १० तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा.’’ निमशिरगाव ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाटील म्हणाल्या, ‘‘सरकार शेतकऱ्यांना रात्री वीज देत असल्याने घरातील प्रमुख जबाबदार व्यक्ती दररोज पाणी पाजण्यासाठी शिवारात जात असतात. दररोज त्यांना वन्यप्राणी यांच्यापासून जीवितास धोका आहे.’’ शुभांगी शिंदे, जयश्री पाटील, संगीता शेट्टी, सन्मती पाटील, सुवर्णा पाटील उपस्थित होत्या.

साप सोडणाऱ्यांवर गुन्हा नोंदवणार : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडणाऱ्या अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार अज्ञात दिसून आले आहेत. पोलिसांनीही याची चौकशी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

शेतीसाठी दिवसा दहा तास वीज पुरवावी, यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान अज्ञातांकडून वीज कार्यालय पेटवणे, तहसील कार्यालयात साप सोडणे असे प्रकार सुरू असतानाच काल जिल्हाधिकारी कार्यालयातही भला मोठा साप सोडला. दरम्यान, सर्पमित्रांनी सापाचा तीन तासांहून अधिक वेळ शोध घेतला पण तो मिळाला नाही.दरम्यान, प्रशासनाकडून काल रात्रीचे फुटेज पाहिले. यामध्ये चार व्यक्ती दिसून आल्या आहेत. त्यांच्या तोंडाला बांधलेले होते. ते ओळखू आले नाहीत. दरम्यान, यावरूनच त्यांचा शोध घेतला जाणार आहे. शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जाणार आहे.