कोल्हापूरमध्ये ड्रग्ज तयार करणारं युनिट उद्ध्वस्त; अडीच कोटींचा माल जप्त : Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढोलगरवाडी: संशयीताचे फार्म हाऊस पोलीसांनी सील केले आहे.

कोल्हापूरमध्ये ड्रग्ज तयार करणारं युनिट उद्ध्वस्त; अडीच कोटींचा माल जप्त

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड (कोल्हापूर) : मुंबई क्राईम ब्रॅंच (Mumbai Crime Branch) पथकाच्या धाडीमुळे ढोलगरवाडी (ता. चंदगड) (Dholgarwadi) हे गाव गेले दोन दिवस चर्चेत होते. येथील उच्च शिक्षित संशयीताच्या फार्म हाऊसची झडती सुरु होती. सोमवारी रात्री सर्व मुद्देमाल जप्त करुन पोलीस पथक आज पहाटे मुंबईला (Mumbai) रवाना झाले. संबंधीत संशयीताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अडीच कोटींचा अंमली पदार्थ सापडल्याचे या पथकातील अधिकाऱ्याने सांगितले. उद्या (ता. 17) मुंबई येथे पत्रकार परीषद घेऊन ते सर्व माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.

गावालगतच असलेल्या फार्म हाऊसवर अशा प्रकारचा व्यवसाय चालत असेल याची ग्रामस्थांना यक्तीचिंतही कल्पना नव्हती. परंतु संबंधीत व्यक्तीचा सुरवातीला पोल्ट्री फार्मचा उद्योग होता. त्यानंतर अलीकडच्या काळात मक्यापासून कडबा कुटी तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले जात होते. बकरी आणि घोडेही पाळले होते. दररोज काही मजूर नियमितपणे कामाला होते. पोलीसांची धाड पडल्यानंतर याबाबतच्या चर्चेला उधाण आले.

हेही वाचा: मदनभाऊंनी जयंतरावांकडे मैत्रीचा हात पुढं केला अन् संघर्षाला पुर्णविराम!

दरम्यान, फार्म हाऊसला चारही बाजूने संरक्षक कुंपण करण्यात आले होते. आतमध्ये दर्जेदार पत्र्यांचा वापर करुन शेड उभारण्यात आले होते. दोन दिवस पोलीसांनी तिथल्या कोपऱ्याची झडती घेतली. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जाते. हा सर्व मुद्देमाल घेऊन पोलीस पथक मुंबईला रवना झाले. संबंधीत फार्म हाऊस पोलीसांकडून सील करण्यात आले आहे. उद्या (ता. 17) मुंबई येथे पत्रकार परीषदेनंतर सर्व माहिती उघड होणार आहे.

loading image
go to top