Kolhapur : त्र्यंबोली यात्रेचा उद्या सोहळा

तयारीला प्रारंभ, श्री अंबाबाईची सिद्धीदात्री रूपात पूजा
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सिद्धीदात्री रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, नवरात्रोत्सवातील महत्त्‍वाचा त्र्यंबोली यात्रेचा सोहळा यंदा शुक्रवारी (ता.३०)पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. दोन वर्षांनी पारंपरिक लवाजम्यासह हा सोहळा होणार असून, टेंबलाई टेकडीवर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज दीड लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात आज अंबारीतील सालंकृत पूजा बांधण्यात आली.

सिद्धीदात्री अंबाबाई

श्री अंबाबाईची सिद्धीदात्री रूपात सालंकृत पूजा बांधली. सिद्धीदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप. सिद्धीदात्री म्हणजे आपल्या उपासनेचे पूर्ण फल प्रदान करणारी देवी. सिद्धी म्हणजेच सामर्थ्य. अष्ट महासिद्धी या जगप्रसिद्ध आहेत; परंतु केवळ त्या असणे म्हणजे सिद्ध नव्हे तर या सिद्धींच्या असण्यानेही ज्याच्या मनाच्या किंवा साधनेच्या कुठल्याही पातळीत फरक पडत नाही तो खरा सिद्ध. अशा सिद्धांची स्वामिनी म्हणजे ही सिद्धीदात्री. देव, दैत्य, मानव असे सर्वजण तिची सेवा करतात. अशीही नवमदुर्गा हातामध्ये गदा, चक्र, शंख व पद्म धारण करते. ती कमलासनावर विराजमान असल्याचे श्रीपूजक अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि प्रसाद लाटकर यांनी सांगितले.

उत्सवातील आजचे सांस्कृतिक कार्यक्रम...

श्री अंबाबाई मंदिरात सकाळी आठला साने गुरुजी महिला भजनी मंडळ, साडेनऊला सद्‌गुरू सेवा माऊली भजनी मंडळ, अकराला गजानन महाराज महिला भजनी मंडळ, साडेबाराला रासाई छंदिक भजनी मंडळ, दोनला गुरुकृपा भजनी मंडळ, साडेतीनला हनुमान भजनी मंडळ, पाचला धनश्री कुलकर्णी यांचे गायन, सहाला एम्स मीडिया ग्रुपचा भक्तिगीत कार्यक्रम तर सातला विजया कुरणे यांच्या शारंगसंध्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी पाचला स्वरदा भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री नऊला आरेगाव येथील विठ्ठलपंथी सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.

मोफत बस सेवा

शारदीय नवरात्रोत्सवात पंचमीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी टेंबलाई येथे

मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शनासाठी जाणे सुलभ होण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या वतीने गेली आठ वर्षे मोफत बससेवा देण्यात येते. यावर्षीही भाविकांसाठी पंचमी दिवशी शुक्रवारी मोफत बससेवा ठेवली आहे. बिंदू चौक ते टेंबलाई आणि परत बिंदू चौक अशी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यासाठी चार गाड्या सुसज्ज ठेवण्यात आल्या असून त्या बिंदू चौक येथून निघणार आहेत. या मोफत बससेवेची वेळ सकाळी ६ ते रात्री ११ अशी ठेवण्यात आली असून, सर्व भाविकांनी या मोफत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.

रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत असून, रास-दांडिया कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध संस्था, संघटनांकडून दांडिया स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन केले असून, आज हॉटेल जोतिबा येथे भरारी फाउंडेशनच्या दांडिया कार्यक्रम रंगला. उद्या (गुरुवारी) जैन सोशल ग्रुपतर्फे महासैनिक दरबार हॉल येथे रास दांडियाचा कार्यक्रम होणार असून शुक्रवारी (ता. ३०) रोटरी क्लबतर्फे महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘रास गरबा’ होईल. शनिवारी (ता. १) हॉटेल सयाजी, रेसिडेन्सी क्लबमध्ये रास दांडियाचा मेगा इव्हेंट आयोजित केला आहे. रविवारी (ता. २) महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे विशाल गडकर कपांऊड, नागाळा पार्क येथे दांडिया स्पर्धा होतील.

महिला अत्यवस्थ

आजरा येथील एका भाविक महिलेला उपचारासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केले. संबंधित महिलेस उच्चरक्तदाबाचा त्रास असून, त्यांनी औषधे घेतली नव्हती. त्यामुळे दर्शन रांगेत त्यांचा रक्तदाब वाढल्याने चक्कर आली. व्हाईट आर्मीच्या जवानांनी त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा केंद्रात नेले. तेथे तज्‍ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित महिलेला सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केल्याचे केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रात्री आठपर्यंत तीन दिवसांत ४५३ भाविकांनी या केंद्राचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com