संघर्ष म्हणजेच एन.डी.

एन. डी. पाटील यांचे जीवन म्‍हणजे संघर्ष गाथा आहे.
संघर्ष म्हणजेच एन.डी.
Summary

एन. डी. पाटील यांचे जीवन म्‍हणजे संघर्ष गाथा आहे.

- संपतबापू पवार-पाटील, माजी आमदार

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील आज आपल्यात नाहीत, हे न पटणारे आहे. गेली अनेक दशके त्यांच्यासोबत विविध आंदोलनात सहभाग घेता आला. शेतकरी कामगार पक्षातील त्यांचे काम जवळून पाहता आले. त्यांच्या एवढा शेती, राजकारण, समाजकारण याचा अभ्यास असणारा माणूस दुर्मिळच. शेतकऱ्यांच्या प्रश्‍‍नासाठी, हक्‍कासाठी काळ, वेळ, तहान-भूक हरपून काम करणारा एन. डीं.सारखा दुसरा नेता नाही. शेतकऱ्यांच्या अडचणींची, त्यांच्या जगण्याची लढाई माहिती असलेले हे अफाट बुद्धिमत्तेचे कनवाळू नेते होते. त्यांच्यासोबतच्या विविध आंदोलनातील अनुभवाच्या शिदोरीवरच कष्टकरी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍काची लढाई पुढील काळात लढावी लागणार आहे. त्यांचा संघर्ष प्रेरणादायी ठरेल...

रोजगार हमीचा संघर्ष

एन. डी. पाटील यांचे जीवन म्‍हणजे संघर्ष गाथा आहे. आयुष्‍यभर त्यांनी केवळ शेतकरी आणि कष्‍टकरी यांचाच विचार करून त्यांच्या न्याय हक्‍कासाठी लढा दिला. त्यामुळे शेतकरी व कष्‍टकऱ्यांच्या प्रश्‍‍नाचा उगम म्‍हणजेच एन. डी.साहेब, असे म्‍हटल्यास वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांविषयी त्यांना खूप तळमळ होती. एन.डीं.चा रुद्रावतार १९७२ सालातील दुष्‍काळामध्ये दिसला. सर्वत्र दुष्‍काळ पडला होता. लोकांच्या हाल अपेष्‍टांना पारावार राहिला नव्‍हता. जगण्यासाठी ते लढत होते. पाऊस पाणी नसल्याने पोटाची आबाळ होत होती. कुपोषणाने अनेकांना मृत्यूशय्‍येवर गाठले होते. अशा काळात लोकांना जगवायचे असेल तर रोजगारी हमीची कामे हाती घेण्याची आग्रही मागणी एन.डी.पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. आंदोलन हे जनआंदोलन बनून गेले. आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन आक्रमक व रक्‍तरंजीत बनले. या आंदोलनात चार कष्‍टकऱ्यां‍चा बळी गेला. अखेर शासनाला रोजगार हमी कायदा करून लोकांच्या हाताला काम द्यावे लागले. एन. डी. पाटील यांच्या प्रयत्‍नाने आणि आंदोलकांच्या रक्‍ताने रोजगार हमी कायदा अस्‍तित्‍वात आला. आज या कायद्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील बेरोजगार, कष्‍टकऱ्यांच्या हाताला काम मिळाले आहे. यामध्ये एन.डी. यांचे योगदान मोठे आहे.

संघर्ष म्हणजेच एन.डी.
ऐनवेळी टेलिप्रॉम्पटर बंद; PM मोदींचा उडाला गोंधळ; काँग्रेसची टीका

मंत्रालयाच्या दारात ११ दिवस उपोषण

भाजप-शिवसेना युती असतानाही विजेचा प्रश्‍‍न गाजला होता. औद्योगीक व शेतकऱ्यांच्या वीज दरात कपात करण्याचे आश्‍‍वासन दिले होते; मात्र सरकार त्याची दखल घेत नव्‍हते. त्यामुळे संतप्‍त डॉ. एन. डी. पाटील यांनी थेट मंत्रालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्‍याचा निर्णय घेतला. मंत्रालयावरील आंदोलन म्‍हणजे आझाद मैदान, असेच मानले जाते. मात्र एन. डी. यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातच आमरण उपोषण सुरू करून तत्‍कालीन सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचे काम केले. जवळपास ११ दिवस त्यांनी हे उपोषण केले. अखेर सरकारला नमते घेऊन एन.डी.यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.

२४ तासांत बिले

सहकार मंत्री असताना शेतकऱ्यांच्या उसाची बिले २४ तासांत देण्याची किमया एन. डी. पाटील यांनी केली. मंत्री असताना ते मंत्रालयात रमले नाहीत. तर शेतकरी, कष्‍टकरी यांना आपल्या मंत्रिपदाचा उपयोग कसा होईल, यासाठी ते पायाला भिंगरी बांधून फिरले. शेतकऱ्याला उसाची बिले देत असताना ती २४ तासांत देण्याचे आदेश दिला. केवळ आदेश न देता त्याची कार्यवाही कशी होईल, हे त्यांनी पाहिले. काही शेतकऱ्यांना बिले विलंबाने मिळाली त्याचे प्रत्येक दिवसांच्या व्याजासह पैसे देण्यात आले.

संघर्ष म्हणजेच एन.डी.
LIVE | एन.डी. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार

शेगाव, नागपूर पायी दिंडी

शासनाने गूळ खरेदी करावी, अशी मागणी एन. डी. पाटील यांनी केली होती. यासाठी कोल्‍हापुरात एकात्‍मिक गूळ खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, वेंगुर्ला येथे काजू खरेदी केंद्र सुरू करावे, असे प्रस्‍ताव शासनाकडे सादर केले. शासनाकडे केवळ प्रस्‍ताव सादर करून किंवा मागणी करून शांत बसतील ते एन. डी. पाटील कसले. केलेल्या रास्‍त मागण्या असल्याने त्या मान्यच कराव्यात यासाठी शासनावर ते पुरेपूर दबाव टाकत. अशाच पद्ध‍तीने त्यांनी एकदा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढली. सुमारे ४५० किलोमीटरच्या या पायी दिंडीत आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते.

सेझचा लढा

जेथे जेथे शेतकरी, गोरगरिबावर अन्याय होईल तेथे तेथे वज्र निर्धार करून एन.डी.पाटील हजर असत. देशाच्या इतिहासात कष्‍टकरी विरुद्ध‍द उद्योजक, अशीच एक लढाई झाली ती रायगडमध्ये. वयाची ८० पार केलेली व्यक्‍ती एक तर अंथरुणात किंवा रुग्‍णालयात पाहायला मिळते. मात्र ८० व्या वर्षी एन.डी.पाटील हे रायगड येथे आदिवासींच्या हक्‍कासाठी अंबानींच्या विरोधात लढण्यास उभे ठाकले. मात्र एन. डी. पाटील यांच्या नेतृत्‍वात येथील आदिवासी, कष्‍कटरी शेतकरी एकवटला. विरोधाची ताकद एवढी प्रचंड होती की अंबानींना एन. डी. पाटील यांच्यासमोर झुकावे लागले.

टोल घालवणार म्‍हणजे घालवणार

टोल आम्‍ही देणार नाही, अशी एकच घोषणा देऊन एन. डी. पाटील यांनी राज्यातील या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची ज्योत पेटवली. टोल म्‍हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचेच अपत्‍य असल्याने त्याला एन.डीं.च्या नेतृत्‍वात जोरदार विरोध केला. टोल घालवल्याशिवाय स्‍वस्‍थ बसायचे नाही, अशी घोषणा एन.डी.यांनी दिली आणि सर्व कोल्‍हापूरकर टोलविरोधात रस्‍त्यावर उतरले. टोलचा ज्‍वाळा मंत्रालयापर्यंत पोहोचल्या आणि शासनाला टोल माफी करावी लागली. लोक आंदोलनानंतर टोल बंद करण्याचे राज्यातील आणि देशातील अत्यंत ठळक उदाहरण बनले आहे.

संघर्ष म्हणजेच एन.डी.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एनडी

आयुष्यभर शेतकऱ्यांची काळजी

कष्‍टकरी, शेतकऱ्यांसाठी एन.डी.यांनी आयुष्य वेचले. शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येयधोरणांपासून ते कधी विचलित झाले नाहीत. गोरगरीब, शेतकरी, कष्‍टकऱ्यांना न्याय देणारे कायदे झाले पाहिजेत, यासाठी त्यांचा कायम आग्रह राहिला. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करावेत, यासाठी दबाव वाढवला. शेतकऱ्याला त्याच्या उत्‍पादन खर्चावर किंमत मिळाली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com