Kolhapur : नवीन वर्षाचा प्रारंभ नाट्यजल्लोषानेच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama

नवीन वर्षाचा प्रारंभ नाट्यजल्लोषानेच!

कोल्हापूर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेला आता डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत राज्यभरातील किमान पाचशे संघ सहभागी होणार असून, किमान १९ केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, डिसेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ होईल, अशी घोषणा संचालनालयाने केली असली तरी स्पर्धांच्या तारखांचा व एकूणच तपशील अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे नववर्षाचे स्वागत यंदा नाट्यजल्लोषानेच होणार आहे.

हौशी राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे हौशी कलाकारांसाठीचे हक्काचे व्यासपीठ. ही स्पर्धा जरी असली तरी यानिमित्ताने स्पर्धेपलीकडे जाऊन हौशी कलाकारांचा आविष्कार घडत असतो. कोल्हापूर केंद्राचाच विचार केल्यास पूर्वी १० ते २५ संघांचा सहभाग असायचा. पण, आता किमान २५ ते ३० प्रवेशिका या केंद्रावर गेल्या तीन-चार वर्षांत हमखास येतात. राज्यातील सर्व केंद्रांच्या तुलनेत येथील केंद्रासह मुंबई, पुणे केंद्रावर सर्वाधिक प्रयोग सादर होतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील १९ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली होती. एकट्या कोल्हापूर केंद्रावर २९ संघांनी प्रयोग सादर केले होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही. मात्र, आता यंदा या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

दृष्टिक्षेपात स्पर्धा

हौशी मराठी नाट्य स्पर्धेसह बालनाट्य, संगीत नाट्य, संस्कृत नाट्य, हिंदी नाट्य आणि दिव्यांग नाट्य अशा विविध स्पर्धा संचालनालयातर्फे होतात. मराठी नाट्य आणि बालनाट्य स्पर्धेत सर्वाधिक संघ सहभागी होतात. एकूणच सर्व स्पर्धांचा विचार केला, तर राज्यभरातील किमान १ हजार संघ स्पर्धेत उतरतात आणि या माध्यमातून किमान २० ते २५ हजारांवर कलाकार व तंत्रज्ञांचा नाट्याविष्कार अनुभवायला मिळतो. यंदापासून राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघासाठी एक अशी दोन ऑनलाईन केंद्रे सुरू होणार.

loading image
go to top