
गडहिंग्लज : प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. त्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून सध्या नळ कनेक्शन असलेल्या कुटुंब प्रमुखाचे आधार लिंक केले जात आहे. मात्र, गावागावात बोगस नळ कनेक्शनधारकांची काही कमी नाही. त्यांच्यासमोर आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. आधार लिंकिंगच्या प्रक्रियेमुळे त्यांची बोगसगिरी समोर येणार आहे. वर्षानुवर्षे चाललेला पाण्याचा बेकायदेशीर वापर उघड होणार आहे.
केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाच्या अजेंड्यावरील ही योजना असल्यामुळे प्रत्येक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जुन्या नळपाणी कनेक्शनधारकांचा आधार क्रमांक लिंक केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या स्तरावर ही प्रक्रिया राबविली जात आहे. आधार लिंक नाही त्यांचे वैयक्तिक नळ कनेक्शन नाही, असे समजून दुसऱ्या टप्प्यात त्यांना नळ कनेक्शन जोडणी दिली जाणार आहे.
मात्र, आधार लिंकिंगच्या या प्रक्रियेत बोगस नळ कनेक्शनधारक समोर येणार आहेत. प्रत्येक गावात असे बोगस कनेक्शनधारक कमी-अधिक प्रमाणात आहेतच. त्यांचे कनेक्शन बेकायदेशीर असल्यामुळे ग्रामपंचायतींकडे नोंद नाही. परिणामी, जलजीवन मिशनच्या प्रक्रियेत ते आधार लिंक करु शकत नाहीत. आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्याकडे नळ कनेक्शन नाही अशीच नोंद होणार आहे. योजनेच्या पुढील टप्प्यात संबंधितांना नळ कनेक्शन जोडणी पुरवायची आहे. प्रत्यक्षात सध्या त्यांच्याकडे नळ कनेक्शन असल्याने तपासणीत ही बोगसगिरी उघड होणार आहे.
राजकीय अपरिहार्यता...
गावागावात पाणी योजना राबविल्या आहेत. या योजनांची नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत पातळीवर चालते. मूळ योजना राबवितानाच बेकायदेशीरपणे कनेक्शन घेतली जातात. हा मामला चोरी-चुपके चालतो. कनेक्शन दिले जाते पण, त्याची ग्रामपंचायतीकडे रितसर नोंद न करण्याचे प्रकार घडतात. राजकीय अपरिहार्यतेमुळे ना कनेक्शन बंद केले जाते ना कारवाई होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
संबधितांवर कारवाई हवी...
पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. नळ कनेक्शनही ग्रामपंचायतीकडूनच दिली जातात. त्यामुळे बेकायदेशीर कनेक्शनधारकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करणे अपेक्षित असते. पण, तसे होताना दिसत नाही. आता आधार लिंकिंगची प्रक्रिया एकाचवेळी सर्वत्र सुरू आहे. यातून बोगस कनेक्शनधारक समोर येणार आहेत. त्यांच्यावर आता तरी कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.